माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात नेमकी कशी झाली? राजीव गांधी यांच्यातील कोणत्या गुणाने सोनिया गांधी यांचे मन जिंकले? या प्रश्नांची उत्तरे खुद्द सोनिया गांधी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहेत. केंब्रिजमधील एका छोट्याशा ग्रीक रेस्टॉरंटमध्ये झालेली पहिली भेट, पहिल्याच नजरेत निर्माण झालेले आकर्षण आणि राजीव गांधी यांचा शांत, सौम्य स्वभाव याबद्दल त्यांनी आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या आगामी पुस्तकाच्या निमित्ताने ही प्रेमकहाणी पुन्हा चर्चेत आली आहे. काय म्हणाल्या सोनिया गांधी? काय ठरलंय निमित्त? सविस्तर जाणून घेऊया.
सोनिया गांधी इंग्लंडमधील केंब्रिज येथे भाषा शिकत असताना राजीव गांधी यांची भेट झाली. त्या काळात त्यांना आपल्या आवडीचे इटालियन जेवण मिळेल, अशी जागा शोधावी लागत होती. त्याच शोधात त्यांना ‘व्हर्सिटी रेस्टॉरंट’ या ग्रीक रेस्टॉरंटची माहिती मिळाली. या ठिकाणी युरोपातील विविध देशांतील विद्यार्थी तसेच भारतीय विद्यार्थी जेवायला येत असत. याच रेस्टॉरंटमध्ये एका म्युच्युयल फ्रेण्डने सोनिया आणि राजीव यांची एकमेकांशी ओळख करून दिली. पुढे हीच साधीशी भेट त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरली.
राजीव गांधी यांना पहिल्यांदा भेटल्यानंतर त्यांच्यासोबत आयुष्य घालवावेसे वाटेल, अशी भावना त्यांच्या मनात जवळजवळ लगेच निर्माण झाली होती. राजीव यांनाही आपल्याबद्दल तशीच भावना असल्याचे नंतर समजल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले. मात्र, या नात्याची सुरुवात केवळ आकर्षणापुरती मर्यादित नव्हती. दोघांमधील मैत्री वाढत गेली आणि त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांच्या या आठवणींमधून त्या काळातील विद्यार्थी जीवनाचीही झलक पाहायला मिळते.
जुन्या फोटोग्राफ्सकडे पाहताना सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांचे वर्णन देखणा आणि अत्यंत सौम्य स्वभावाचा तरुण असे केले. त्यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होतेच; पण त्यांच्यातील नम्रता आणि शांतपणा सोनिया यांना विशेष भावला. राजीव यांच्या स्वभावातील हाच गुण पहिल्या भेटीत मनाला स्पर्श करून गेल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे त्यांच्या प्रेमकहाणीतील महत्त्वाचा भाग केवळ बाह्य आकर्षण नसून व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव यांचाही होता, असे त्यांच्या आठवणींवरून दिसते.
In a small Greek restaurant in Cambridge my journey of love began. Rajiv and I created a world filled with love, laughter and memories. On 10th November, I share that world with you. https://t.co/zvN5Rqqstf
— Sonia Gandhi (@SoniaGandhi) October 24, 2026
पहिल्या भेटीनंतर सोनिया आणि राजीव यांची मैत्री अधिक घट्ट झाली. मित्रांसोबतच्या पार्ट्या, वेगवेगळी ठिकाणे पाहण्यासाठी केलेल्या सहली आणि विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांमध्ये दोघे एकत्र वेळ घालवत असत. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने झालेल्या एका पार्टीची आठवणही सोनिया यांनी सांगितली. या साध्या, रोजच्या अनुभवांतून त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. अखेर 25 फेब्रुवारी 1968 रोजी दोघे विवाहबंधनात अडकले. पुढे राजीव गांधी भारताचे पंतप्रधान झाले; मात्र त्यांच्या नात्याची सुरुवात राजकारणापासून दूर, केंब्रिजमधील विद्यार्थी जीवनात झाली होती.
सोनिया गांधी यांच्या आगामी पुस्तकाचे नाव ‘Belonging: A Journey of Love’ असे आहे. हे पुस्तक 10 नोव्हेंबर 2026 रोजी प्रकाशित होणार असल्याचे वृत्त आहे. या पुस्तकातून त्यांचे वैयक्तिक आयुष्य, राजीव गांधी यांच्यासोबतचे नाते आणि आयुष्यातील महत्त्वाच्या अनुभवांवर प्रकाश पडण्याची अपेक्षा आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरील पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी पुस्तकाची झलक दाखवणारा व्हिडिओ शेअर केला. सार्वजनिक जीवनात अनेक वर्षे राजकीय भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या सोनिया गांधी यांच्या या आठवणींमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा वेगळा पैलू समोर आला आहे.