गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार आहे, अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीपासून मुंबईत अनेक भेटीगाठी होत आहे, असं दिसून येतंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येणार अशी जोरदार चर्चा असताना सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.
दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून सुप्रिया सुळे म्हणाल्यात की, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर तर्क वितर्क रोज चालत असतात. मी कोणत्याही तातडीसाठी पत्रकार परिषद बोलावली नाहीय. तुम्ही तेच तेच प्रश्न विचारुन तुमचा आणि माझा टीआरपी घातवताय, असं त्यांनी स्पष्टच सांगितलं. त्या पुढे म्हणाल्यात की, मला त्याच त्या प्रश्नांचा कंटाळा आलाय. माझा दादा अजित पवार असताना विलिनीकरणाची चर्चा झाली होती. त्याचे व्हिडीओ तुम्ही पाहिले आहेत. मी आणि अनेक नेत्यांनी सांगितलं की, हो अजित पवारांसोबत दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा झाली होती. मात्र, ज्या दिवशी अजित पवारांचं निधन झालं त्यादिवशी विलिनीकरणाच्या चर्चांना फुलस्टॉप लागला आहे. तारीखही ठरली होती. आमच्या पक्षाचा कोणताही नेत्या त्यांच्याशी बोलण्यासाठी गेलेला नाही. आमचं एकत्र जाणं भावाबरोबर ठरलं होतं. तोच राहिला नाही, तर एकत्र जाण्याचा प्रश्नच येत नाही. हा आमच्यासाठी भावनिक मुद्दा आहे आणि तो माझ्या भावाचे नातं आहे. आता कुठलेही चर्चा झालेली नाहीत. यापुढे मी जे नातं हे माझ्या भावासोबत होतं, मात्र आता भाऊच नाही राहिला आता काय चर्चा करणार. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, माझ्या आणि माझ्या भावाच्या मधील गोष्टी आहेत, त्या आमच्यामध्येच राहणार.
अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची दिल्लीत बैठक झाली अशी माहिती समोर आली आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं की, मी प्रफुल्ल पटेल यांना आठवड्यातून एकतर भेटतेच. अनेक प्रकल्पावर आमच्या कामानिमित्त भेट होत असते. प्रफुल पटेल आणि आमचे संबंध 6 दशकांचे आहेत. प्रफुल पटेल आणि मी दोन जेपीसीवर एकत्र आलो आहेत.
दरम्यान एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांसंदर्भातही सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यांनी सांगितलं की, मला कुणाचाही फोन, मेसेज, इमेल, जे काही असतं तसं काहीही आलेले नाही, असं सांगत या चर्चांनाही पूर्णविराम लावला आहे. तर डिलिमिटेशनबाबत आमची बैठक झाली. 50% जागा वाढणार असेल तर विचार करणार, असंही त्या यावेळी म्हणाल्यात.