उत्तर भारत आणि दक्षिण भारत वाद आता धार्मिक वळणावर पोहोचला असून या वादातून केलेल्या विधानावरुन नव्या वादाचा जन्म झाला आहे. हे विधान केलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी. रेवंत रेड्डीच्या ताज्या विधानावरुन भारतीय जनता पार्टीने नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं रेवंत रेड्डी काय म्हणाले आणि भाजपाचं त्यावर काय म्हणणं आहे ते पाहूयात...
मोदींचा उल्लेख
रेवंत रेड्डी यांनी प्रभू श्रीराम व भगवान शंकराची तुलना केली आहे. 'श्रीराम श्रीमंतांचा, तर शिव गरिबांचा देव आहे', असे त्यांनी म्हटले आहे. 'आम्ही (काँग्रेस) शिवाचे भक्त आहोत, तर भाजप श्रीरामाचा भक्त आहे', असेही ते म्हणाले. भाजपने प्रभू श्रीराम चोरले. हा श्रीमंतांचा पक्ष आहे, म्हणूनच तो 'जय श्री राम'चा जयघोष करतो, असेही रेड्डी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप नेते नेहमी 'जय श्री राम' म्हणतात, पण 'हर हर महादेव' का म्हणत नाहीत? असा सवाल रेड्डी यांनी उपस्थित केला. रेड्डी 'द कॉन्क्लेव्ह 2026' या माध्यम समूहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले असता हे वक्तव्य केले.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
आम्ही द्रविड आहोत, उत्तरेकडील लोक आर्य आहेत. आम्ही भगवान शिवाचे भक्त आहोत, ते भगवान रामाचे भक्त आहेत. आमच्या स्वतःच्या परंपरा आहेत, असे रेड्डी यांनी म्हटले होते. रेवंत रेड्डी यापूर्वीही वक्तव्यांमुळे वादात सापडले आहेत. त्यांनी एकदा बिहारच्या डीएनएवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भाजपने प्रभू श्रीरामाला राजकीय चिन्ह बनवले असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपाकडून कठोर शब्दांमध्ये टीका
भाजपाने या विधानावरुन रेड्डीवर हिंदू समाज आणि देवांमध्ये विभागणी करण्याचा आरोप केला आहे. हे फोडा आणि राज्य करा असं धोरण असल्याचं भाजपाने म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांनी या विधानावरुन टीका करताना, "रेवंत रेड्डी आता राम आणि शिव यांच्यात राजकीय भेद निर्माण करत आहेत. तेलंगणात वेमुलवाडा (दक्षिण काशी – शिव) आणि भद्राचलम (दक्षिण अयोध्या – राम) आहेत. मुख्यमंत्र्यांनी देवांना उत्तर-दक्षिण किंवा गरीब-श्रीमंत असे विभागू नये," असं आवाहन केलं आहे. तेलंगणा भाजपा अध्यक्ष एन. रामचंद्र राव यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. हे विधान हिंदू धर्माचा अपमान करणारे आहे आणि हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे, असं एन. रामचंद्र राव यांनी म्हटलंय.
विश्व हिंदू परिषदेचा हल्लाबोल
विश्व हिंदू परिषदेने मुख्यमंत्री रेड्डी यांच्या वक्तव्यावर हल्ला चढवत मंगळवारी आरोप केला की, काँग्रेस पक्षाने समाजात फूट पाडण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. त्यांचे हे वक्तव्य श्रद्धेवरील उघड हल्ला असून काँग्रेसच्या बुडणाऱ्या जहाजातील शेवटचे प्रवासी म्हणून पक्षाचे नेते देव-देवतांमध्येही फूट पाडण्याच्या पातळीवर गेले आहेत.