20 लाखांची कचोरी! भारतभर चर्चेत असलेला Viral Video पाहिला का? गाडीवरुन पाठलाग करण्याऐवजी...
हा व्हिडीओ पाहून लाखो रुपये चोरीला गेल्यानंतर हा व्यापारी संपूर्ण ताकदीने या व्यक्तींचा पाठलाग करु शकला असता असं अनेकांनी म्हटलं आहे. मात्र तो तर हातातली कचोरीही खाली न टाकता चोरांमागे पळत सुटल्याचंही व्हिडीओत दिसतंय.
'नजर हटी, दुर्घटना घटी' हे वाक्य तुम्ही हायवेने प्रवास करताना अनेकदा वाचलं असेल. मात्र याच वाक्यप्रचाराची आठवण करुन देणारा प्रकार राजस्थानमधील जयपूरमध्ये घडला असून संपूर्ण घटनाक्रम कॅमेरात कैद झाला आहे. येथील एका व्यापऱ्याला 20 रुपयांची कचोरी तब्बल 20 लाख रुपयांना पडली आहे. या व्यपाऱ्यासोबत जे काही घडलं ते कॅमेरामध्ये कैद झालं आहे.
कुठे घडला हा सारा प्रकार?
हा सारा प्रकार सोमवारी नाहरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याच सीसीटीव्हीच्या आधारे आता पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. ही चोरी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. 20 लाख रुपयांची कॅश घेऊन जात असतानाच अचानक भूक लागल्याने दुचाकीवरुन जाणारा हा व्यापारी कचोरीच्या ठेल्याजवळ थांबला. त्याने स्कूटरवर पुढल्या बाजूला ठेवलेल्या पिशवीमध्ये 20 लाख रुपये कॅश असल्याने दुचाकीवरुन न उतरता तिच्यावर बसूनच कचोरी खाण्याचा आणि भूक शमवण्याचा निर्णय त्याने घेतला. मात्र त्याचवेळी या अरुंद गल्लीमध्ये मागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरांनी या व्यापाऱ्याच्या स्कूटीवरील 20 लाख रुपये कॅश असलेली पिशवी उचलून नेली.
सीसीटीव्हीमध्ये काय दिसतंय?
चंपलाल नावाचा व्यापारी प्रचंड भूक लागल्याने कचोरी खाण्यासाठी थांबला होता. त्याने रोख रकमेची बॅग आपल्या स्कूटरच्या समोर ठेवली होती, तेव्हाच दोन व्यक्तींनी ती बॅग उचलली आणि पळ काढला, असं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. चंपलाल यांनी संशयितांचा पाठलाग केला, स्थानिक लोकही मदतीला धावून आले, परंतु ते दोघेही पळून जाण्यात यशस्वी झाले. विशेष म्हणजे चोरांचा पाठलाग करतानाही चंपालाल यांनी हातातली अर्धवट खाल्लेली कचोरी सोडली नाही. तें कचोरी हातात घेऊनच चोरांचा पाठलाग करु लागल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये चंपलाल आरामात आपल्या स्कूटरवर बसून कचोरी खाताना दिसत आहे. कचोरी खाण्यात मग्न असतानाच, शेजारी दुसरी एक स्कूटर येऊन थांबते. त्यावरील मागे बसलेली व्यक्ती चपळाईने चंपालाल यांच्या समोर पायाजवळ स्कूटीवर पडलेली रोख रकमेची बॅग हिसकावून घेते आणि दोघेही तिथून पळून जातात. चंपलाल, यांना काही कळण्याच्या आधीच चोरांनी तिथून धूम ठोकली. चंपालाल यांना काय झालंय हे समजल्यानंतर ते गाडीवरुन उतरले आणि हातात कचोरीची प्लेट तशीच पकडत चोरांमागे धावू लागले. हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय.
पोलिस परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. हेल्मेट घातलेल्या त्या दोन व्यक्तींची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. चंपलाल यांच्या तक्रारीवरून नाहरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र 20 लाखांची चोरी झाल्यानंतर तरी चंपलाल यांनी कचोरीचा नाद सोडून थेट आपल्या दुचाकीवरुन त्यांचा पाठलाग करायला पाहिजे होता असं अनेकांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे.