मध्य प्रदेशळमधील ग्वाल्हेर जिल्ह्यातील शीतला माता मंदिराबाहेर झालेल्या अपघातासंदर्भात हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. येथील मंदिराजवळ जमलेल्या भाविकांच्या गर्दीत घुसलेल्या या ट्रकमुळे 15 जणांचा मृत्यू झाला असून हा अपघात नेमका कसा झाला याचं खरं कारण समोर आलं आहे. 42 जण जखमी झालेला हा अपघात 600 ते 700 जणांना आपल्या कचाट्यात घेणारा ठरला असता अशी भिती जिल्हाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. नेमकी या अपघाताबद्दलची कोणती माहिती समोर आलीये आणि कोणी काय म्हटलंय पाहूयात...
नेमकं झालं काय?
चीनूर रस्त्यावरून तांदळाची पोती भरलेला एक अनियंत्रित ट्रक वेगाने शीतला माता मंदिराच्या दिशेने आला. या मार्गावर मोठा उतार असून अवजड वाहनांना येथे प्रवेश बंदी होती. ट्रकने पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले. 90 अंश उतारावरुन खाली येत ट्रक रस्त्यावरील भाविकांना व दुकानांना चिरडत थेट मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि भिंतीवर जाऊन आदळला. ही धडक एवढ्या जोरात होती की ट्रकच्या धडकेमुळे मंदिराची भिंत कोसळली आणि अनेक लोक भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून जखमींमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. सर्व जखमींना ग्वाल्हेरच्या जयारोग्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कशामुळे झाला अपघात?
प्राथमिक तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे दीडच्या सुमारास घडलेल्या घटनेमागे गूगल मॅपवरुन रस्ता शोधण्याचा प्रयत्न कारणीभूत असल्याचे समजते. मूळाचा दिल्लीचा असलेला ट्रकचालक बिलबागसिंग (44) जीपीएसच्या मदतीने मार्ग शोधत होता. गूगल मॅपने शॉर्टकट शोधण्याच्या प्रयत्नात त्याचा ट्रक चिनार रस्त्यावरील नो एंट्रीत शिरला आणि त्याने शीतला माता मंदिराच्या परिसरात उभ्या असलेल्या भाविकांना चिरडले. हे मंदिर सुमारे 125 वर्षे जुने आहे. ट्रकच्या धडकेमुळे मंदिराच्या भिंतीचा काही भाग भाविकांच्या अंगावर कोसळला. बिलबागसिंगला पोलिसांनी अटक केली. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
600 ते 700 भाविकांना धोका होता? 8 पोलीस निलंबित
जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनावरील नियंत्रण मिळवण्यासाठी चालकाने ट्रक डावीकडे वळवला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. ट्रक सरळ पुढे गेला असता, तर 600 ते 700 भाविकांना धडक बसली असती. या प्रकरणात पोलिसांच्या हलगर्जीपणाचे आरोप झाल्यानंतर प्रशासनाने मोठी कारवाई करत नगर पोलीस अधीक्षकांना पदावरून हटवले असून आठ पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना सहा लाखांची मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. मृतांच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मध्य प्रदेश सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये, गंभीर जखमींना दोन लाख रुपये, तर अन्य जखमींना 50 हजार रुपये मदत जाहीर केली आहे.