उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील एका डोसाच्या दुकानात दोन तरुणींनी मोठा गोंधळ घातला. डोसाचे सामान जमिनीवर फेकून दिले, भांडी आदळली. हा सगळा गोंधळ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मुलीनी घातलेल्या या गोंधळाचे कारणही फार आश्चर्यचकित करणारे आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेल्या अकाउंटवरुन हा दावा करण्यात आला आहे की, या दोन तरुणी बहिणी आहेत. तसंच, व्हिडिओत दिसतंय की, पहिले स्कुटरवरुन दोघी बहिणी दुकानाबाहेर येतात. त्यानंतर दुकानात ठेवलेले सामान फेकण्यास सुरुवात करतात. अचानक झालेल्या या प्रकारामुळं दुकानातील कर्मचारीदेखील गोंधळले आहेत. तसंच, दुकानाबाहेर उभे असलेले ग्राहकाही काही काळासाठी धास्तावून उभे होते. तर दुकानाबाहेर मोठी गर्दी जमली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या भेलुपूर येथे ही घटना घडली आहे. 4 नोव्हेंबर रोजी या तरुणींच्या वडिलांचा हॉटेल चालकासोबत वाद झाला होता. त्यानंतर तो वाद विकोपाला गेला होता. त्यानंतर तरुणींच्या वडिलांना हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती. या विरोधात कुटुंबाने भेलूपू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. निराश झालेल्या या तरुणींनी अखेर हे प्रकरण स्वतःच्या हातात घेतले.
व्हिडिओत दिसतंय की, एक मुलगी स्कूटरवरून येऊन खानावळ आणि तिच्या आजूबाजूच्या परिसराचे चित्रीकरण सुरू करताना दिसत आहे. त्यांच्यापैकी एक जण अचानक त्या हॉटेलकडे धावते आणि पिठाने भरलेला एक डबा उलटवते. तसंच, डोशाचा तवा फेकून देताना दिसतेय. हा गोंधळ सुरू असताना दुकानात बसलेल्या महिला हे पाहून बाहेर पळून गेल्या. तर एका महिलेने या तरुणींना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी तिच्यासोबतही हुज्जत घातली.
Two girls in Varanasi vandalised a dosa shop after their father was allegedly brutally beaten by the shop's employees. With no police action for nearly two weeks, their frustration turned into anger. https://t.co/hQFlA6UCM6
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 16, 2026
दुकान चालकाचा आरोप आहे की, आम्ही या तरुणींना अडवल्यानंतर त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तर, दुकानातील काही सामान फेकण्यास हल्ला करण्यास सुरुवात केली. ज्यामुळं दुकानातील कर्मचारी व तिथे उपस्थित असलेल्या ग्राहकांना किरकोळ जखमा आल्यात.
घटनेनंतर, दुकानदाराने भेलूपूर पोलीस ठाण्यात जाऊन त्या दोन तरुणींवर कारवाई करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली आहे. दुकानदाराच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 352, 351(3), 115(2) आणि 324(4) अंतर्गत अज्ञात तरुणींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता त्या दोन तरुणींची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. या प्रकरणाचा तपासही सुरू आहे. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.