भारतात रेल्वे प्रवास करताना अनेकदा सर्रासपणे नियमांचं उल्लंघन करत आपल्यासह इतरांचा जीव धोक्यात टाकताना दिसतात. ट्रेनमध्ये आग लागू शकेल किंवा स्फोट होऊ शकेल असा वस्तू नेण्यास बंदी असतानाही त्या सोबत बाळगल्या जातात. काही जण तर त्या वस्तूंचा वापरही करताना दिसतात. या गोष्टी व्हिडीओत कैद झाल्याने समोर येतात आणि किती मोठा धोका निर्माण करण्यात आला होता याची प्रचिती येते. दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा धक्कादायक व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचाही संताप होईल. कारण यामध्ये एक व्यक्ती धावत्या ट्रेनमध्ये चक्क दिवा पेटवून पूजा करत आहे. या व्हिडीओवर रेल्वेनेही प्रतिक्रिया दिली आहे.
God of War या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती उघडा बसलेला दिसत आहे. त्याने धोतर नेसलं असून अंगावर आणि माथ्यावर विभूती लावली आहे. यावेळी तो रेल्वेत समोर असलेल्या टेबलावर पूजेचं साहित्य मांडून शंख फुंकताना दिसत आहे.
त्याच्या समोर असलेल्या टेबलावर एक दिवा पेटत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. यावेळी त्याची ज्योत स्पष्टपणे दिसत आहे. तसंच फुलांनी सजवलेली देवतेची फ्रेम केलेला फोटो, झेंडूच्या फुलांचे हार, काही ताटं व वाट्या आणि एक शंख आहे. ट्रेन पुढे जात असताना, खिडकीतून बाहेरचा परिसर दिसत आहे; दरम्यान, तो माणूस शंख खाली ठेवतो आणि टेबलावरील इतर वस्तू हाताळतो.
ఓ పని చేయండి స్వామి. నిన్న జ్వాలాతోరణం అంట. సో మొత్తం వత్తుల దండ తెచ్చి ట్రైన్ కి అతికించి తోరణం అంటూ పెట్టండి 🙏 హారతులు, శంఖారావంలు ఇంట్లో, గుళ్ళలో, లేక ప్రార్థనకు కేటాయించిన స్థలాల్లో మంచిది కానీ, ఇలా ట్రైన్లు, ఫ్లైట్లలో చేస్తే మనతో ఉన్న అందరికి ప్రమాదం https://t.co/3Stl94fYmj
— శిఖివాహన 🦚 #GodofWar 🦚 (@SNsharma95) November 26, 2026
ही पोस्ट समोर आल्यानंतर धावत्या ट्रेनमध्ये अशाप्रकारे आगीचा वापर करण्यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, 'रेल्वे सेवा' (Railway Seva) कडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली असून, संबंधित अकाऊंटला या घटनेची सविस्तर माहिती देण्यास सांगण्यात आलं आहे, जेणेकरून या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करता येईल.
दरम्यान, अनेक युजर्सनी ट्रेनमध्ये अशा प्रकारची कृती करण्यास परवानगी कशी मिळाली आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी यात हस्तक्षेप का केला नाही? अशी विचारणा केली आहे.
एका युजरने उपरोधिक टिप्पणी केली की, प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठी कदाचित ट्रेनला आग लागेपर्यंत वाट पाहावी लागेल. तर दुसऱ्या एका युजरने कर्तव्यावर असलेल्या पोलीस आणि तिकीट तपासनीसांच्या (TTE) भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काहींनी तर कर्तव्यावर असलेल्या टीटीई (TTE), आरपीएफ (RPF) कर्मचारी आणि कोच अटेंडंटला निलंबित करण्याची मागणीही केली आहे.