केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्ड दहावी आणि बारावीच्या 2027 च्या बोर्ड परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बोर्डाने 6 नोव्हेंबर 2026 रोजी दोन्ही वर्गांचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर त्यात पुन्हा बदल होणार का?, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या 2027 च्या मुख्य बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक 6 नोव्हेंबर रोजी जाहीर केले. विद्यार्थ्यांना विषयानुसार परीक्षांच्या तारखा, विषयांचे कोड आणि परीक्षेच्या वेळेची माहिती पीडीएफमध्ये मिळणार आहे. हे वेळापत्रक सीबीएसईशी संलग्न भारतातील तसेच परदेशातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. बोर्डाने परीक्षांच्या सुमारे 101 दिवस आधी वेळापत्रक जाहीर केलंय.
सीबीएसई दहावीच्या मुख्य बोर्ड परीक्षा 16 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार असून 9 मार्च 2027 रोजी संपणार आहेत. विद्यार्थ्यांना एकूण 83 विषयांच्या परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. परीक्षेचे नियोजन करताना प्रत्येक विषयाच्या तारखेसोबत विषयाचा कोड तपासणे महत्त्वाचे आहे. विशेषतः मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गणित यांसारख्या विषयांच्या तारखा विद्यार्थ्यांनी आपल्या विषयसंयोजनानुसार तपासाव्यात.
बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षाही 16 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहे. दहावीच्या तुलनेत बारावीचे वेळापत्रक अधिक लांब असून शेवटचा पेपर 9 एप्रिल 2027 रोजी होणार आहे. बारावीच्या परीक्षेत एकूण 121 विषयांचा समावेश आहे. सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या विषयांच्या तारखा स्वतंत्रपणे तपासून अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या सीबीएसईने जाहीर केलेल्या वेळापत्रकात बदल करण्याबाबत कोणतीही नवीन अधिकृत अपडेट समोर आली नाही. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलल्या जातील किंवा विषयांच्या तारखा बदलल्या जातील, असे आता सांगता येणार नाही. मा प्रशासकीय कारणांमुळे बोर्डाला आवश्यक वाटल्यास सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याचा पर्याय असेल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमितपणे सीबीएसईच्या वेबसाइटवरील ताज्या अपडेट्स सेक्शनवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नियमित सीबीएसई संलग्न शाळांमधील दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्प मूल्यांकन आणि अंतर्गत मूल्यमापन 1 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2027 दरम्यान होणार आहे. हिवाळी प्रदेशातील शाळांसाठी हा कालावधी 9 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2026 असा आहे.
CBSE ची अधिकृत cbse.gov.in. वेबसाइटला वर जा.
मेन पेजवरील लेटेस्ट अपडेट सेक्शनवर जा.
Date Sheet for Class X and Class XII Board Examinations, 2027 या लिंकवर क्लिक करा.
पीडीएफ डाउनलोड करून विषयांच्या तारखा तपासा.
वेळापत्रकाची प्रिंट काढून अभ्यासाच्या नियोजनासाठी जवळ ठेवा.
मुंबई, पुणे, नागपूरसह महाराष्ट्रातील सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांनाही हे वेळापत्रक लागू असेल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्या.