8व्या वेतन आयोगात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 5.15 लाखांपर्यंत एरियर मिळणार?
44,900 रुपये मूळ वेतन, 2.57 फिटमेंट फॅक्टर आणि DA नुसार संपूर्ण गणित समजून घेऊया.
1/8
8वा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना 5.15 लाखांपर्यंत एरियर? ₹44000 बेसिक पे असणाऱ्यांना किती फायदा?
आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा करणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यास कर्मचाऱ्यांना मागील महिन्यांचा थकबाकी पगार म्हणजेच एरियर मिळू शकणार आहे. आठव्या वेतन आयोगासंदर्भात काय आहे महत्वाची अपडेट? सविस्तर जाणून घेऊया.
2/8
44,900 रुपये बेसिक पे असल्यास
एका उदाहरणात्मक गणनेनुसार, सहाव्या वेतन स्तरातील (Pay Level 6) आणि 44,900 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला सुमारे 5.15 लाख रुपये एरियर मिळू शकतो. मात्र ही रक्कम निश्चित नाही. 2.57 फिटमेंट फॅक्टर गृहीत धरून ही गणना करण्यात आली आहे. प्रत्यक्ष वेतनवाढ, एरियरची पात्रता आणि त्याची रक्कम केंद्र सरकारच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल.
3/8
44,900 रुपये मूळ वेतन असल्यास किती मिळणार?
सातव्या वेतन आयोगानुसार Pay Level 6 मधील कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 44,900 रुपये असल्याचे उदाहरण घेण्यात आले आहे. आठव्या वेतन आयोगात 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास नवीन मूळ वेतनाची गणना अशी होईल.
सध्याचे मूळ वेतन 44,900 रुपये असल्यास गृहीत फिटमेंट फॅक्टर 2.57 पकडूया. संभाव्य नवीन मूळ वेतन 1,15,393 रुपये असेल. म्हणजेच मूळ वेतनात मोठी वाढ दिसू शकते. मात्र 2.57 हा अधिकृतपणे मंजूर झालेला फिटमेंट फॅक्टर नाही.
4/8
महागाई भत्ता वजा केल्यानंतर एरियर कसा मोजणार?
एरियरची गणना करताना सध्याचा महागाई भत्ता विचारात घेणे आवश्यक आहे. या उदाहरणात जानेवारी ते जून 2026 या कालावधीसाठी 60 टक्के आणि जुलै ते डिसेंबर 2026 या कालावधीसाठी 63 टक्के DA गृहीत धरला आहे. जानेवारी ते जूनचे मूळ वेतन + DA = 71,840 रुपये. जुलै ते डिसेंबर : मूळ वेतन + DA = 73,187 रुपये.नवीन संभाव्य मूळ वेतन आणि सध्याचे मूळ वेतन व DA यातील फरक काढून एरियरचा अंदाज लावण्यात आला आहे. म्हणजेच आधीपासून मिळालेला DA पुन्हा एरियरमध्ये मोजला जाणार नाही.
5/8
12 महिन्यांचा एरियर किती होऊ शकतो?
या गणनेनुसार जानेवारी ते जून या सहा महिन्यांसाठी दरमहा सुमारे 43,560 रुपये आणि जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांसाठी दरमहा सुमारे 42,213 रुपयांचा फरक गृहीत धरला आहे. यात जानेवारी ते जूनचा एरियर 2,61,360 रुपये, जुलै ते डिसेंबरचा एरियर 2,53,278 रुपये असेल. म्हणजेच एकूण संभाव्य एरियर 5,14,638 रुपये असेल. अशा प्रकारे 12 महिन्यांचा एरियर जवळपास 5.15 लाख रुपये होऊ शकतो. ही गणना गोलाकार केलेल्या आकड्यांवर आधारित आहे. प्रत्यक्ष रक्कम वेगळी असू शकते.
6/8
HRA, प्रवास भत्ता आणि इतर कपातींमुळे रक्कम बदलणार
कर्मचाऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष जमा होणारा एरियर केवळ मूळ वेतनाच्या गणितावर ठरणार नाही. घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, वार्षिक वेतनवाढ, पदोन्नती आणि एमएसीपी यांचाही अंतिम रकमेवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय आयकर, एनपीएस, सीजीएचएस आणि सीजीईजीआयएस यांसारख्या कपातींमुळे हातात मिळणारी रक्कम कमी होऊ शकते. त्यामुळे 5.15 लाख रुपये म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा होणारी निश्चित रक्कम नाही.
7/8
आठव्या वेतन आयोगाचा अहवाल कधी येणार?
केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली. आयोगाला शिफारशी सादर करण्यासाठी स्थापनेपासून 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानुसार मे 2027 च्या आसपास आयोगाचा अहवाल येण्याची अपेक्षा आहे.
8/8
अंतिम निर्णय केंद्र सरकारचा
ऑक्टोबर 2026 मध्ये बंगळुरू आणि मुंबई येथे आयोगाच्या महत्त्वाच्या बैठका झाल्या. मात्र, 10 ऑगस्ट 2026 रोजी लोकसभेत दिलेल्या उत्तरानुसार आयोगाने त्यावेळी आपल्या शिफारशी सरकारला सादर केल्या नव्हत्या. वेतन आयोगाच्या शिफारशी कधीपासून लागू करायच्या आणि एरियर कसा द्यायचा?, याचा अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार आहे.