संगमेश्वर येथे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोकणच्या ऐतिहासिक वैभवाचे रूप पुन्हा एकदा समोर आले आहे. कुठे सापडलाय हा अनोखा ठेवा
सह्याद्रीच्या कुशीत आणि निसर्गाच्या गर्द वनराईत वसलेल्या कोकणाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाची एक समृद्ध किनार लाभली आहे.
1/9
कोकणात सापडला भग्नावस्थेतील राजवाडा अन् मंदिराचे अवशेष; रानवेलींच्या कुशीत दडलेला प्राचीन इतिहास
संगमेश्वर तालुक्यातील पूर्वीचे ‘धर्मपूर’ आणि आजचे ‘धामापूर’ हे गाव सध्या अशाच एका विस्मृतीत गेलेल्या सोनेरी इतिहासाची साक्ष देत उभे ठाकले आहे.
2/9
अनमोल ऐतिहासिक ठेवा
शतकानुशतके झाडाझुडपांत, लतावेलींत आणि रानगवताच्या गर्द छायेत दडलेले एका ऐतिहासिक राजवाड्याचे भग्नावशेष आणि प्राचीन मंदिराचे अवशेष नुकतेच उजेडात आले आहेत. या अनमोल ऐतिहासिक ठेव्याचे जतन करून पुरातत्व विभागाने येथे तातडीने संशोधन करावे, अशी आर्त हाक आता ग्रामस्थांमधून पुढे येत आहे.
3/9
चालुक्य ते शिलाहार
प्राचीन ‘अपरांत’ म्हणजेच कोकणच्या भूमीत संगमेश्वर हे केवळ धार्मिकच नव्हे, तर एक गजबजलेले व्यापारी केंद्र होते. सातव्या शतकात करवीरच्या चालुक्य राजा कर्णाने संगमेश्वर येथे प्रसिद्ध ‘कर्णेश्वर मंदिर’ उभारल्याचा गौरवशाली इतिहास आहे.
4/9
360 मंदिरे बांधली
राजा कर्णाने त्याकाळी सुमारे 360 मंदिरे बांधली अथवा त्यांची डागडुजी करून त्यांच्या देखभालीसाठी गावेच्या गावे इनाम दिली होती. याच कालखंडात अंतर्गत दळणवळण व शेतीच्या दृष्टीने ‘धामापूर’ हे अत्यंत मोक्याचे ठिकाण मानले जात होते. धामापूर गावात आढळणारे हे अवशेष याच समृद्ध राजवटीचा जिवंत वारसा सांगतात.
5/9
शिरावर कोरलेला उंच किरीट
धामापूरच्या निसर्गरम्य पऱ्याकाठी (ओढ्याकाठी) जांभ्या चिऱ्यांच्या विटांमध्ये बांधलेले हे ऐतिहासिक संकुल विखुरलेल्या अवस्थेत आढळते. कालौघात या मंदिराचे बाह्य बांधकाम ढासळले असले तरी मुख्य गर्भगृह आजही काळाशी झुंज देत उभे आहे. गर्भगृहात एक पुरातन देखणी मूर्ती असून तिच्या शिरावर कोरलेला उंच किरीट (जटामुकूट), कंबरपट्टा आणि मांड्यांपर्यंत पोहोचणारे वस्त्र अत्यंत कलाकुसरीने रेखाटलेले दिसते.
6/9
मूर्तीचा राजबिंडा डौल
गुडघ्याखाली दोन्ही पाय भग्न अवस्थेत असले, तरी मूर्तीचा राजबिंडा डौल आजही थक्क करणारा आहे. मूर्तीमागील कमानदार चौकट आणि मुकुटाची ढब ही कोकणातील शिलाहारकालीन शिल्पकलेशी तंतोतंत जुळणारी आहे. मूर्ती ज्या चौकोनी पिठावर उभी आहे, त्यावरून ही घडण साधारण 11 व्या ते 13 व्या शतकातील म्हणजेच 'शिलाहार ते उत्तर यादव' कालखंडातील असावी, असा अंदाज ऐतिहासिक नोंदीवरून व्यक्त केला जात आहे..
7/9
राजवाड्याचे अवशेष
स्थानिक रहिवासी आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक श्री. दत्ताराम तानू भायजे यांच्या सांगण्यानुसार, स्थानिक भाषेत ‘गिमोस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात पूर्वी चालुक्य राजाची राजेशाही वास्तव्यास असावी. काळाच्या ओघात राजेशाही संपली तरी लोकसंस्कृतीच्या रूपाने इथला आदर आजही जिवंत आहे..
8/9
राजघराण्याची कुलदेवता
कोकणच्या लोकजीवनाचा प्राण असलेल्या शिमगोत्सवात (होळी) वाघजाई आणि जाखमाता या ग्रामदैवतांच्या पालख्या या राजवाड्याच्या प्रांगणात मानासाठी आणल्या जातात. जाखमाता ही पूर्वापार चालत आलेली राजघराण्याची कुलदेवता मानली जाते. येथे परंपरेनुसार पहिला मानपान स्वीकारल्यानंतरच पालख्या पुन्हा मूळ सहाणेकडे मार्गस्थ होतात. राजा गेला, राजवट संपली; मात्र धामापूरच्या ग्रामस्थांनी श्रद्धेचा हा सेतू शतकानुशतके अखंड जपून ठेवला आहे..
9/9
इतिहासाला हवी संशोधनाची नवी दृष्टी
आजही या हिरव्यागार शांततेत लपलेला हा चालुक्यकालीन खजिना पाहण्यासाठी स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींची पावले येथे वळतात. मात्र, योग्य देखभालीअभावी काळाच्या उदरात गडप होऊ पाहणाऱ्या या अनमोल वास्तूंचे तातडीने संवर्धन होण्याची गरज आहे. पुरातत्व विभागाने येथे शास्त्रीय उत्खनन आणि सखोल संशोधन केल्यास, संगमेश्वर परिसराचा आणि प्राचीन कोकणचा एक गौरवशाली सुवर्णकाळ जगासमोर आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या ऐतिहासिक ठेव्याचे रक्षण करावे, अशी मागणी होत आहे.