शारदीय नवरात्रीचा उत्साह नऊ दिवसांत देवीच्या नऊ रुपांची पूजा करण्यात येत आहे. नवरात्रीमध्ये महाष्टमी आणि महानवमीला विशेष महत्त्व आहे. या दोन तिथीला कन्यापूजेला अतिशय महत्त्व आहे. अष्टमी, नवमी आणि दशमी तिथी दोन दिवसांमध्ये आल्या आहेत. 19 ऑक्टोबरला अष्टमी आणि नवमी आहे. तर 20 ऑक्टोबरला नवमी आणि दशमी आहे. त्यामुळे कन्यापूजन नेमकं कधी करायचं याबद्दल भाविकांमध्ये संभ्रम आहे. कारण महाराष्ट्रात उदय तिथीनुसार सण आणि व्रताची तिथी मानली जाते.
मराठी पंचांगानुसार अष्टमी तिथी 18 ऑक्टोबर 2026 रविवारी सकाळी 8:27 वाजेपासून 19 ऑक्टोबर 2026 सोमवारी सकाळी 10:52 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर नवमी तिथी सुरू होणार असून ती 20 ऑक्टोबर 2026 दुपारी 12:50 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर दशमी तिथी सुरु होणार आहे. अशा स्थितीत 19 ऑक्टोबर 2026 ला सोमवारी महाष्टमी असणार आहे. त्यानंतर नवमी तिथीसुद्धा आहे. त्यामुळे 19 ऑक्टोबर 2026 ला सकाळी 10:52 नंतर कन्यापूजा तुम्ही करू शकता. तर 20 ऑक्टोबर 2026 दुपारी 12:50 वाजेपूर्वीही नवमी तिथी असल्याने तुम्ही कन्या पूजा केल्यास काही हरकत नाही.
घरातील देवघर स्वच्छ करून देवीसमोर दिवा, अगरबत्ती, फुले, कुंकू, अक्षता आणि नैवेद्य ठेवा. त्यानंतर कन्यांना आदराने पूजेसाठी आमंत्रित करा.मग कन्यांना स्वच्छ आसनावर बसवून त्यांचे प्रेमाने स्वागत करा. घरच्या परंपरेनुसार पाय धुऊन, कपाळावर कुंकू आणि अक्षता लावून पूजन करा. त्यानंतर देवीची आरती करून कन्यांना हलवा, पुरी, काळे चणे, फळे किंवा घरच्या परंपरेतील सात्त्विक भोजन द्या. तसंच आपल्या क्षमतेनुसार फळे, पुस्तके, उपयोगी वस्तू, कपडे किंवा दक्षिणा द्या.
अष्टमी आणि नवमी तिथीसोबत दसरा तारखेबद्दलही संभ्रम आहे. कारण उदय तिथीनुसार 21 ऑक्टोबर 2026 ला दशमी तिथी मानली जातेय. पण महाराष्ट्रात विजयादशमी म्हणजेच दसरा हा 20 ऑक्टोबर 2026 साजरा करण्यात येणार आहे. पण महाराष्ट्र सोडून इतर राज्यात दसरा हा 21 ऑक्टोबर 2026 ला साजरा केला जाणार आहे.