Cricket News : तेलंगणा येथून क्रिकेट विश्वाला हादरा देणगी एक दुःखद घटना समोर आलेली आहे. तेलंगणाच्या 17 वर्षीय महिला क्रिकेटरने पंख्याला लटकून गळफास घेत आत्महत्या केली आहे, सदर घटना ही तेलंगणा येथील विकाराबाद मधू कॉलोनी येथील असून काही दिवसांपूर्वीच नंदिनीचं सिलेक्शन हे बीसीसीआयच्या अंडर 19 संघात झालेलं होतं. त्यानंतर अचानकपणे नंदिनीने हे टोकाचं पाऊल उचलल्याने संपूर्ण कुटुंब हे धक्क्यात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार नंदिनी ही विकाराबाद जिल्ह्यातील सांगयापल्ली गावात राहत होती. विकाराबाद येथे आपल्या आजीच्या घरी राहून नंदिनी शिक्षण पूर्ण करण्यासोबतच क्रिकेट कोचिंग सुद्धा घेत होती. अंडर-19 संघात सिलेक्शन झाल्यावर नंदिनीमुळे विकाराबाद आणि तिच्या गावाला ओळख मिळाली होती. तसेच आगामी काळात ती अजून पुढे जाईल अशी देखील आशा बाळगली जात होती.
नेमकं कारण काय?
नंदिनीच्या कुटुंबाने आरोप लावला आहे की अनिल आणि कृष्णा नावाचे दोन पुरुष हे नंदिनीला सारखे त्रास द्यायचे. याच कारणामुळे नंदिनीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असं म्हटलं जात आहे. इंडिया टुडेच्या नुसार अनिल मागच्या काही दिवसांपासून नंदिनीचा पाठलाग करायचा. तर कृष्णा त्याला या सगळ्यात साथ देत होता.
पोलिसांना सकाळी 9 वाजता नंदिनीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. विकाराबाद सर्कल इन्स्पेक्टर रघु यांनी सांगितले की, आज सकाळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तपासातून असे समोर आले आहे की, नंदिनीने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दोन व्यक्तींवर छळाचा आरोप केल्याचेही इन्स्पेक्टरनी स्पष्ट केले. पुढील तपासासाठी पोलिसांनी नंदिनीचा मोबाईल फोन जप्त केला असून तो फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवला आहे.
पोलिसांनी तक्रार केली दाखल :
नंदिनीच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांनी न्यायाची मागणी केली असून त्यांनी रस्त्यावर याबाबत निदर्शन सुद्धा केली. त्यांनी दोन्ही आरोपींना अटक करण्याची आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. नंदिनीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी संशयास्पद मृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे.