IND U19 VS NEP U19 : एसीसी पुरुष अंडर 19 आशिया कप 2026 मध्ये भारत विरुद्ध नेपाळ यांच्यात पहिला सामना खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा 10 विकेटने पराभव केला असून स्पर्धेची विजयी सुरुवात केली. अल अमेरात क्रिकेट मैदानावर वनडे फॉरमॅटमध्ये खेळल्या या स्पर्धेच्या सामन्यात नेपाळला भारताने 128 धावांवर रोखले. नेपाळकडून भारताला विजयासाठी 129 धावांचं आव्हान मिळालं असताना भारताकडून वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर आणि लक्ष्य राजेश रायचंदानीने जबरदस्त फलंदाजी करून एकही विकेट न गमावता विजयाचं आव्हान पूर्ण केलं. यात दोन्ही युवा फलंदाजांनी अवघ्या 19.1 ओव्हरमध्ये हे आव्हान पूर्ण केलं. त्यामुळे भारताने हा सामन्यात विजय मिळवला.
भारतीय गोलंदाजांचा कहर :
सुरुवातीला टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेला नेपाळ संघ भारतीय फलंदाजी समोर ढेर झाला. गोलंदाजांच्या पुढे पूर्णपणे ढेपाळलेला नेपाळचा संघ हा 42.3 ओव्हरमध्ये 128 धावा करून ऑलआउट झाला. भारतासाठी ईशान सूदने उत्कृष्ट गोलंदाजी करत 10 ओव्हरमध्ये 18 धावा देऊन 3 विकेट मिळवले, तर अर्जुन राजपूतनेही घातक गोलंदाजी करत 5.3 ओव्हरमध्ये केवळ 8 धावा देऊन 3 विकेट घेतले. याव्यतिरिक्त यशवीर गौडने 2 विकेट घेतले. तसेच मनाल चौहान आणि काव्या पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट मिळवला. या सर्वांच्या कामगिरीमुळे नेपाळचा संघ कमी धावसंख्येवर सर्वबाद झाला.
आर्यवीर सहवाग आणि कर्णधार लक्ष्य रायचंदानीचं अर्धशतक :
129 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय संघाने आपल्या दोन्ही ओपनर्सच्या जोरावर धडाकेबाज सुरुवात केली. भारताचे दिग्गज माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याचा मुलगा, आर्यवीर सेहवाग याने आपल्या वडिलांच्या शैलीशी मिळतीजुळती आक्रमक फलंदाजी करत, अवघ्या 52 बॉलमध्ये 70 धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीदरम्यान आर्यवीरने 7 चौकार आणि 4 षटकार लगावत नेपाळच्या गोलंदाजांना पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले.