Arshdeep Singh Injury Updates : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात बुधवारी हैदराबाद येथे सामना खेळवला गेला. या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी 35 धावा हव्या होत्या. भारताकडून फलंदाजी करण्यासाठी शेवटची जोडी मैदानात होती. यावेळी वेस्ट इंडिजचा गोलंदाज श्मार जोसफने टाकलेला वेगवान बॉल या हा अर्शदीपच्या खांद्याला जाऊन लागला. दुखापत झाल्यावर सुद्धा काही काळ अर्शदीप सिंहने फलंदाजी सुरु ठेवली मात्र तो खूप वेदनेत होता. भारताचा पराभव निश्चित असल्याने कर्णधार श्रेयसने त्याला परत बोलावून घेतले, ज्यामुळे भारताची इनिंग संपली आणि वेस्ट इंडिजने सामन्यात 24 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे सध्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ही पाच सामन्यांची सीरिज ही 2-2 अशा बरोबरीत आहे. आता पाचवा आणि शेवटचा सामना कोण जिंकणार यावरून सीरिजचा विजेता ठरेल.
शमार जोसेफच्या बॉलचा फटका बसल्यानंतर अर्शदीप सिंग खूप वेदनेत असल्याचे दिसून आले. त्याला फलंदाजी सुरू ठेवायची होती, परंतु तो संघर्ष करत होता. कर्णधार श्रेयस अय्यरने त्याला मैदानाबाहेर येण्याचा इशारा दिला, त्यानंतर भारतीय डावाचा शेवट झाला आणि वेस्ट इंडिजने सामना जिंकला.
अर्शदीपच्या दुखापतीवर काय म्हणाला संजू सॅमसन?
संजू सॅमसनने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अर्शदीप सिंहच्या दुखापतीवर मोठी अपडेट दिली आहे. त्याने म्हटलं की, 'अर्शदीप आपल्या खांद्यावर बर्फ लावत आहे. आशा आहे की तो लवकर बरा होईल. ज्या चेंडूने त्याला दुखापत झाली, तो अत्यंत वेगाने येत होता; तो लवकर पूर्णपणे बरा होईल अशी अपेक्षा आहे'. बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.
पाचवा टी20 सामना आता निर्णायक ठरला असून, जो संघ हा सामना जिंकेल तो मालिकाही आपल्या नावावर करेल. आतापर्यंत, भारतीय संघाने मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध कोणतीही टी20 सीरिज गमावलेली नाही. पाचव्या टी20 सामन्यात अर्शदीप सिंग खेळण्याची शक्यता कमी आहे. मात्र याबद्दल अधिकृत माहिती मिळणे अजून बाकी आहे.
कधी होणार पाचवा सामना?
भारत विरुद्ध वेस्टइंडीज यांच्यात पाचवा टी20 सामना हा शनिवारी 17 ऑक्टोबर रोजी चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर आणि लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार अँप आणि वेबसाईटवर होणार आहे.