बेन स्टोक्ससाठी बीसीसीआयने बदलला नियम? IPL 2027 च्या ऑक्शनमध्ये मिळाली एंट्री
Ben Stokes In IPL 2027 : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज ऑलराऊंडर बेन स्टोक्सने यंदा आयपीएल 2027 च्या मिनी ऑक्शनसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. मात्र त्याचं नाव यादीत आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Ben Stokes In IPL 2027 : आयपीएल 2027 च्या सीजनसाठी 16 डिसेंबर रोजी गोव्यात मिनी ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनसाठी खेळाडूंनी आपलं रजिस्ट्रेशन केलं असून 1200 हून अधिक खेळाडूंनी आपली नावं नोंदवलं आहे. मात्र यात सर्वात आश्चर्यचकित करणारं नाव आहे इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर बेन स्टोक्सचं. इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज ऑलराऊंडर बेन स्टोक्सने सुद्धा आयपीएल ऑक्शनसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. 2023 नंतर पहिल्यांदाच बेन स्टोक्स हा आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे.
क्रिकेबझच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या खुलाश्यानुसार बीसीसीआयने नोंदणीकृत खेळाडूंची एक मोठी यादी जाहीर केली आहे ज्यात 1220 नावांचा समावेश आहे. सर्व 10 फ्रँचायझींसोबत ही यादी शेअर करण्यात आली असून या यादीत भारतसह विविध देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. बेन स्टोक्सचे नाव असणे ही सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट ठरली आहे. त्याने आपली बेस प्राईस २ कोटी रुपये निश्चित केली असून इंग्लंडच्या या माजी कर्णधाराने काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र त्याचे नाव या यादीत असणे हे त्याच्या निवृत्तीमुळे नव्हे, तर बीसीसीआयच्या विशिष्ट नियमांमुळे आश्चर्यकारक ठरले आहे.
बीसीसीआयने बदलला नियम :
बीसीसीआयने आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी परदेशी खेळाडूंबाबत एक कठोर नियम केला होता. या नियमात स्पष्ट होतं की विदेशी खेळाडू जे आयपीएलमध्ये आधी खेळलेले आहेत जर त्यांनी मेगा ऑक्शनसाठी रजिस्टर केलं नाही तर ते पुढील मिनी ऑक्शनमध्ये सामील होऊ शकत नाहीत. इंग्लंडचा खेळाडू बेन स्टोक्सने 2025 मेगा ऑक्शनसाठी आपलं नाव रजिस्टर केलं नव्हतं. ज्यामुळे त्याला आयपीएल 2026 आणि 2027 च्या मिनी ऑक्शनमध्ये स्थान मिळायला नको हवं होतं. मात्र बेन स्टोक्सचं नाव रजिस्टर केलेल्या नावांच्या यादीत आहे. तेव्हा बीसीसीआयने बेन स्टोक्ससाठी आपला नियम बदलला का? याची चर्चा होतेय. या नियमाला एक अपवाद होता की जर एखादा खेळाडू आपल्या राष्ट्रीय संघाकडून अशा आशयाचे पुष्टीकरण मिळवू शकला ज्यात दुखापत किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळे तो सहभागी होऊ शकला नाही, असे नमूद केलेले असेल तर त्याला कदाचित परवानगी दिली जाऊ शकत होती. तेव्हा आता संदर्भात, स्टोक्सच्या बाबतीत आता हाच सर्वात कुतूहल निर्माण करणारा प्रश्न ठरला आहे.