SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

रोहित शर्माला पुन्हा धक्का? कर्णधारपदाची पुन्हा हुलकावणी? IPL 2027 मध्ये 'या' तरुणाकडे 'मुंबई इंडियन्स'चं नेतृत्व?

इंडियन प्रिमिअर लीगच्या 2027 च्या पर्वामध्ये मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धक्का देणारा निर्णय संघ व्यवस्थापनाकडून घेतला जाऊ शकतो असं सांगितलं जात आहे. नेमकी काय चर्चा सुरु आहे याबद्दलची जाणून घ्या...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 30, 2026, 08:27 AM IST | Updated: Oct 30, 2026, 09:22 AM IST
Image Credit: 2027 मध्ये कोणाकडे असणार संघाची धुरा? (प्रातिनिधिक फोटो)
Join

इंडियन प्रिमिअर लीग 2027 साठी सर्वच संघांनी आपली तयारी सुरु केली असून संघाची जुळवाजुळव सुरु झाली आहे. पाच वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघानेही आपल्या कोचिंग स्टाफमध्ये पूर्णपणे बदल केला आहे. मात्र कोचिंग स्टाफ बदलल्यानंतर संघ व्यवस्थापनासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे असा आहे की कर्णधारपदाची जबाबदारी कोणावर टाकायची? विशेष म्हणजे या पदासाठी माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावाची चर्चा असली तरी आता लाँग टर्मचा विचार केला असता तरुण खेळाडूकडे संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये. विशेष म्हणजे अशा एका तरुण खेळाडूचं नाव चर्चेत आहे. त्यातही खास बाब अशी की हा तरुण खेळाडू रोहितच्याच मुशीत तयार झालेला आहे. हा खेळाडू कोण आणि 

रोहितबरोबरच दोन वरिष्ठ खेळाडूही

हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवल्यानंतर संघाला फारशी चमक दाखवता आलेली नाही. त्यामुळे हार्दिक संघच सोडून जाईल अशी दाट शक्यता असल्याने कर्णधारपद पुन्हा रोहितकडे जाईल अशी दाट शक्यता आहे. मात्र याबद्दल खात्री देता येत नाही. त्यामुळेच रोहितसोबतच इतर पर्यायांचीही चाचपणी केली जात आहे. संघात दोन फार अनुभवी खेळाडू असून यामध्ये करिअरच्या उत्तरार्धात असलेला टी-20 वर्ल्डकप जिंकवून देणारा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश आहे. अनेकांनी कर्णधारपद बुमराहकडे सोपवण्यास नापसंती दर्शवली असून सूर्यकुमारही काही काळात क्रिकेटचाच निरोप घेईल अशी शक्यता असल्याने त्याच्याकडे नेतृत्व सोपवलं जाण्याची शक्यता कमी आहे.  

2027 च्या आयपीएलनंतर मोठ्या घडामोडी?

गेल्या तीन हंगामांत संघाचा कर्णधार राहिलेल्या हार्दिक पांड्याबाबत मुंबई इंडियन्सने अद्याप कोणत्याही 'ट्रेड' प्रस्तावाची अधिकृत घोषणा केलेली नाही. तो संघात राहिला तरी त्याच्याकडे कर्णधारपद जाण्याची शक्यता फारच धूसर आहे. 2027 च्या आयपीएलनंतर एक 'मेगा-ऑक्शन' होणार आहे, जिथे बहुतेक आयपीएल संघ पुढील पाच ते सात वर्षांचा विचार करून शून्यापासून पुन्हा आपली टीम तयार करतील, असं मानलं जात आहे. तोपर्यंत संघाची संपूर्ण पुन:बांधणी शक्य नाही. 

हे तीन जण घेणार निर्णय

याच कारणामुळे आगामी आयपीएल हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघाचे मालक आकाश अंबानी, वरिष्ठ अधिकारी राहुल संघवी, मुख्य प्रशिक्षक कायरन पोलार्ड या तिघांकडून एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. संघाला पाच वेळा आयपीएल जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माकडे पुन्हा एकदा नेतृत्वाची धुरा सोपवायची, की भारताचा टी-20 उपकर्णधार तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली नवीन सुरुवात करायची? होय तुम्ही बरोबर वाचलं रोहितसमोर त्याच्याच सावलीत तयार झालेल्या तिलकचं आवाहन असणार आहे. मात्र 2028 आयपीएलसाठीच्या मेगा ऑक्शनआधीच्या एका पर्वासाठी तिलकला कर्णधार बनवण्याऐवजी या हंगामात रोहितवर जबाबदारी टाकून नव्या टीमसहीत 2028 मध्ये नव्या जोमाने सुरुवात करण्याचाही इशारा असू शकतो अशीही चर्चा आहे.

रोहितचं शेवटचं पर्व?

2027 च्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा 40 वर्षांचा असेल. त्यामुळेच हे त्याचं शेवटचं पर्व असू शकतं. 2027 च्या एकदिवसीय वर्ल्डकपनंतर रोहित क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता अधिक आहे. सध्या रोहित याच स्पर्धेसाठी कसून सराव करत असून त्याचा अंतिम उद्देश 2027 चा वर्ल्डकप जिंकण्याचं आहे.

रोहितची जमेची बाजू

मैदानावर असताना पटापट अचूक निर्णय घेणे, योग्य वेळी योग्य खेळाडू निवडणे, सामना क्षणात आपल्या बाजूने फिरवणारे डावपेच टाकणे यामध्ये रोहितचा हात सध्याच्या मुंबईच्या संघात कोणीच धरु शकत नाही. मात्र आता मुंबईच्या फ्रँचायझींच्या कार्यपद्धतीत आता मोठा बदल झाला आहे. आता संघ व्यवस्थापन केवळ अनुभवावर अवलंबून न राहता, आकडेवारीचे विश्लेषण आणि भविष्यातील दीर्घकालीन धोरणांचा विचार करून निर्णय घेताना दिसत असल्याचं मागील काही वर्षांमध्ये पाहायला मिळालंय. गेल्या काही हंगामांत रोहितचा वापर प्रामुख्याने 'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणून केला गेला आहे. परंतु, जर तो पुन्हा कर्णधार झाला, तर मुंबई इंडियन्सला सामन्याच्या परिस्थितीनुसार दुसऱ्या कोणाला तरी 'सबस्टिट्यूट' (पर्यायी खेळाडू) म्हणून वापरण्याची संधी मिळेल.

भाविष्यातील कर्णधार कोण?

दुसरीकडे तिलक वर्माबद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकडे भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. जोपर्यंत रोहित खेळतोय तोपर्यंत मुंबई इंडियन्सचा खेळाडू म्हणून रोहितच्या मार्गदर्शनाखाली शिकू शकतो. आता त्याने शिकून घेतलं तर भविष्यात, किमान पुढील पाच वर्षांसाठी तिलक हा मुंबईची धुरा सांभाळणारा एक दीर्घकालीन कर्णधार म्हणून उत्तम पर्याय ठरु शकतो.

नवीन मुख्य प्रशिक्षक कायरन पोलार्डसोबतचे नाते

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने जिंकलेल्या पाचही जेतेपदांमध्ये सध्या नवीन मुख्य प्रशिक्षक पोलार्ड हा एक महत्त्वाचा घटक ठरला आहे. तो अशा काही मोजक्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे ज्याने रोहितला कर्णधार म्हणून प्रत्येक टप्प्यात अगदी जवळून पाहिलं आहे. मुंबई इंडियन्सच्या वर्तुळात या दोघांच्या बॉण्डची चांगलीच चर्चा असते. रोहितला समजून घेण्यात पोलार्ड कमी पडेल असं वाटत नाही. दोघांचं उत्तम जमत असल्याने याचा फायदा संघाला होऊ शकतो. आयपीएलमधील अनेक जेतेपदांच्या पर्वांमध्ये, या जोडगोळीने अत्यंत कठीण परिस्थितीतून संघाला विजय मिळवून दिला होता. आयपीएल 2027 मध्ये मुंबई इंडियन्स आपल्या संघरचनेत फारसा मोठा बदल करणार नाही. अशा परिस्थितीत, उपलब्ध खेळाडूंच्या गटासोबत संघचा कारभार पाहण्यासाठी कर्णधार म्हणून रोहित हाच सर्वोत्तम पर्याय ठरु शकेल.

नवा कर्णधार 2028 पासून?

तिलक वर्माचा विचार केल्यास, जर त्याच्याकडे नेतृत्व सोपवलं गेलं तर तो नक्कीच एका नवीन संघासहीत काम करणं पसंत करेल. 2027 च्या पर्वानंतर होणाऱ्या मेगा-ऑक्शनमध्ये खेळाडूंच्या निवडीबाबतही त्याचे मत महत्त्वाचे ठरेल. म्हणूनच त्याला पुढच्या पर्वापासून कर्णधारपद दिलं जाऊ शकतं, अशीही चर्चा आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES