जागतिक क्रिकेटमध्ये 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्माचं अपयश पुन्हा चर्चेत आलं आहे. नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आपल्या फलंदाजीची प्रभाव पाडण्यात रोहित अपयशी ठरला. त्याने चार सामन्यांमध्ये केवळ 30 धावा केल्या. चारपैकी दोन सामन्यांमध्ये तर तो शून्यावर बाद झाला. न्यूझीलंडमधील एक एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाल्याने चार सामनेच झाले.
संधी मिळणार की नाही?
आगामी आयपीएल पर्वामध्ये मुंबई इंडियन्सची धुरा पुन्हा संभाळणार असल्याची चर्चा असलेल्या या 39 वर्षीय सलामीवीराच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले असून त्याला वर्ल्डकप 2027 मध्ये संघात संधी मिळेल की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. रोहितने कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून याआधीच निवृत्ती घेतली असून तो भारतासाठी केवळ एकदिवसीय सामनेच खेळतो. रोहितच्या खराब फॉर्मबद्दलच्या चर्चेदरम्यान, भारताला पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारतीय क्रिकेट रसिकांना आणि रोहितच्या चाहत्यांनाही पटकन स्वीकार न होणारं एक सत्य सांगितलं आहे.
कपिल देव नेमकं काय म्हणाले?
"प्रत्येक खेळाडूला एक दिवस निवृत्त व्हावेच लागते," असं कपिल देव यांनी म्हटलं आहे. रोहितच्या भविष्याबद्दल अनावश्यक शक्यता व्यक्त करणे, अंदाज बांधणे टाळले पाहिजे आणि हा निर्णय निवड समितीवर सोडला पाहिजे, असंही कपिल देव यांनी म्हटलं आहे. 'संडे मिड-डे'ला दिलेल्या मुलाखतीत, 1983 साली वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या कपिल यांनी, "जर तो (रोहित शर्मा) खेळू शकत असेल, तर ते चांगलं आहे. तो (त्याला संघात ठेवायचं की नाही हा) निर्णय मी निवड समितीवर सोपवू इच्छितो. जर त्यांनी ठरवले की त्याची वेळ संपली आहे, तर तो पूर्णपणे निवड समितीचा निर्णय आहे. कारण निवड समिती एकत्रितपणे खेळासाठी सर्वोत्तम काय आहे याचा विचार करते," असं म्हटलं आहे.
सचिन, धोनीचा उल्लेख
एवढ्यावरच न थांबता अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचं नाव घेत कपिल देव यांनी रोहितलाही त्यांच्याच मार्गानं जावं लागणार असल्याचं कपिल देव यांनी म्हटलं आहे. "रोहितने देशासाठी प्रचंड योगदान दिले आहे, पण तो आयुष्यभर भारतीय संघाकडून खेळणार नाही. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, आर अश्विन, एम. एस. धोनी यांसारख्या दिग्गज खेळाडूंनाही एक दिवस संघ सोडावा लागला. प्रत्येक खेळाडूला एक दिवस निवृत्त व्हावेच लागते," असं या माजी कर्णधाराने म्हटलं आहे.