इंडियन प्रिमियर लीग 2027 च्या आधी मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. आयपीएल 2027 च्या आधी मुंबई इंडियन्सचा संघ आपल्या कोचिंग स्टाफमध्ये बदल करत आहेत. काही दिवसांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने त्यांच्या मुख्य प्रशिक्षणपदी झहीर खानची घोषणा केली होती, तर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सौरव गांगुलीला नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मुंबई इंडियन्सचा संघ हा आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी संघापैकी एक आहे, आता त्यांनी त्याचा मुख्य प्रशिक्षक बदलल्यांनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एमआयने अनुभवी प्रशिक्षक महेला जयवर्धने यांना परस्पर संमतीने कार्यमुक्त केले आहे.
मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी फ्रन्चायझीला अलविदा केला आहे. मागील दशकाहून अधिक काळापासून मुंबई इंडियन्स माझ्या प्रवासाचा एक खूप खास भाग राहिले आहेत. खेळाडू, प्रशिक्षण संघ, #OneFamily चा अविश्वसनीय पाठिंबा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आमच्या चाहत्यांनी हा एक असा अनुभव बनवला आहे जो मी नेहमीच जपून ठेवीन. आपण सर्वांनी मिळून काही अविस्मरणीय क्षण अनुभवले आहेत, आव्हानांना सामोरे गेलो आहोत आणि अशी एक गोष्ट उभारली आहे, ज्याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटेल.
हे ही वाचा
पुढे प्रशिक्षकाने सांगितले की, मी श्रीमती नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांचे त्यांच्या अढळ विश्वासासाठी, पाठिंब्यासाठी आणि मैत्रीसाठी मनःपूर्वक आभार मानू इच्छितो. आपण सर्वांनी मिळून जे काही मिळवले आहे, त्याचा मला प्रचंड अभिमान आहे आणि मुंबई इंडियन्स माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान टिकवून ठेवेल. मी संघाला पुढील अनेक वर्षांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आयपीएल 2017 मध्ये मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षणपदी नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी महेला जयवर्धनने रिंकी पॅाटिंगची जागा घेतली होती. 2022 मध्ये, त्याने या भूमिकेतून पायउतार होऊन मुंबई इंडियन्सचे ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स हे पद स्वीकारले.
2025 मध्ये तो मुख्य प्रशिक्षक म्हणून संघात परतला आणि आयपीएल 2026 हा मुंबई इंडियन्ससोबतचा त्याचा शेवटचा हंगाम असेल. महेला जयवर्धनेच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएल 2017, आयपीएल 2019 आणि आयपीएल 2020 जिंकले. तो निःसंशयपणे मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी प्रशिक्षक आहे. आयपीएलमध्ये खेळाडू कायम ठेवण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर आहे. खेळाडूंची खरेदी आणि त्यांना संघातून मुक्त करण्यासाठी एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना, मुंबई इंडियन्सला आता मुख्य प्रशिक्षक शोधावा लागेल.