Asian Para Games 2026 : एशियन पॅरा गेम्स 2026 ही स्पर्धा 18 ऑक्टोबर पासून सुरु झाली आहे. जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत भारताला मोना अग्रवाल हिने स्पर्धेतील यंदाचे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात सुवर्णपदक जिंकले आणि यादरम्यान एशियन पॅरा गेम्समध्ये नवा विक्रमही रचला. महत्वाची गोष्ट अशी की भारताला रौप्यपदकही याच प्रकारात मिळाले.
2028 पॅरा ऑलम्पिकसाठी झाली क्वालिफाय :
मोना अग्रवाल हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच1 प्रकारात 250 गुणांची नोंद करत केवळ एशियन पॅरा गेम्स विक्रमच मोडला नाही, तर सुवर्णपदकही पटकावले. याच प्रकारात भारताच्या अवनी लेखरा हिने 249.6 गुणांसह रौप्यपदक जिंकले. या विजयामुळे भारतीय नेमबाजांनी 2028 च्या लॉस एंजेलिस पॅरालिम्पिकसाठीही पात्रता मिळवली आहे.
मागच्या एशियन पॅरा गेम्समध्ये अवनी लेखाराने सुवर्णपद जिंकलं होतं. मात्र यावेळी अवनी 0.4 गुणांच्या फरकाने आपले सुवर्णयश पुन्हा मिळवण्यापासून हुकली. मोना अग्रवालने तिला पराभूत करून एशियन पॅरा गेम्समधील आपले पहिले पदक जिंकले. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच 1 प्रकारात मोनाने पात्रता फेरीत 629.1 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आणि एशियन गेम्समध्ये विक्रमही प्रस्थापित केला. त्याच पात्रता फेरीत अवनी लेखरा हिने 626.4 गुण नोंदवले होते.
कोण आहे मोना अग्रवाल?
मोना अग्रवालचा जन्म हा राजस्थानच्या सीकरमध्ये झाला असून वॉलीबॉल सहित सर्व खेळ खेळल्यावर मोनाने 2021 मध्ये शूटिंगमध्ये आपलं करिअर बनवण्याचं ठरवलं. मोना जेव्हा 9 महिन्याची होती तेव्हा तिला पोलिओ झाला होता. मोना आपल्या 3 बहिणींमध्ये सर्वात लहान होती. तिच्या दोन मोठ्या बहिणींच्या जन्मानंतर तिच्या पालकांना मुलाची अपेक्षा होती. त्यामुळे कुटुंबात मोनाकडे नको असलेले मुलं म्हणून पाहिले जात असे. मात्र तिची आजी गीतादेवी, नेहमी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.