Rohit Sharma Captain Mumbai Indians : इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आगामी आयपीएल 2027 साठी त्यांच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या 20 व्या सीजनचा कर्णधार असणार असून शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी मुंबईने याबाबत मोठी घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वात याआधी मुंबई इंडियन्सने 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. आयपीएल 2023 नंतर जवळपास 3 वर्षांनी रोहित शर्माकडे पुन्हा एकदा संघाचं नेतृत्व करेल.
काय म्हणाला रोहित शर्मा?
पुन्हा एकदा आयपीएल 2027 साठी मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यावर रोहितने फ्रेंचायझीचे आभार मानले. तसेच मुंबई इंडियन्सकडून जाहीर केलेल्या निवेदनात रोहित शर्मा म्हणाला की, 'मुंबई इंडियन्स माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग राहिला आहे आणि या संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी नेहमीच अभिमानाची गोष्ट राहिली आहे. आगामी सीजनबाबत नीता भाभी आणि आकाश यांच्यासोबत झालेली चर्चा अतिशय उत्साहवर्धक होती आणि आपण काय साध्य करू शकतो, यावर माझा पूर्ण विश्वास आहे'.
आगामी सीजनसाठी संघाचा प्लॅन कसा असणार हे सांगताना रोहित म्हणाला की, 'मी 20 व्या सीजनसाठी, पुढील आव्हानांसाठी आणि आमच्या पलटनला आनंद साजरा करण्याच्या अनेक संधी मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. आमचा मुख्य भर आमच्या शैलीतील क्रिकेट खेळण्यावर, एकत्रितपणे स्पर्धा करण्यावर आणि खेळाचा आनंद घेण्यावर असेल'.
रोहित शर्माची आयपीएल कारकीर्द :
रोहित शर्मा हा 2011 मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग बनला. यापूर्वी तो डेक्कन चार्जसकडून खेळत होता. रोहित शर्मा 2013 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019, आणि 2020 रोजी आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. रोहित शर्मा 2023 सीजन पर्यंत मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता, मात्र त्यानंतर हार्दिक पांड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. आयपीएल 2024 ते 2026 हे तीन सीजन हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाचा परफॉर्मन्स ढासळला. त्यानंतर हार्दिकला आयपीएल 2027 पूर्वी पंजाब किंग्सकडे ट्रेड करण्यात आल्यावर रोहित शर्माकडे पुन्हा एकदा नेतृत्व सोपवण्यात आलं. रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 281 सामने खेळले असून यात त्याने 7329 धावा, 15 विकेट्स घेतले आहेत.