भारतीय संघ सध्या पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपच्या तयारीला लागला आहे. मात्र नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेने भारतीय संघाचं टेन्शन अजून वाढवलं आहे. या मालिकेमध्ये भारतीय सलामीवीरांना खास करून रोहित शर्माला विशेष प्रभाव पाडता आला नाही. या मालिकेमध्ये चार सामन्यांत रोहितला 30 धावा करता आल्या. त्यामुळेच रोहितच्या भविष्याबद्दल आणि त्याला 2027 च्या एकदिवसीय वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळणार का याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. मात्र रोहितच्या या कामगिरीमुळे त्याच्या मित्रासमोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. हा मित्र कोण त्याच्यासमोरची अडचण कोणती हे जाणून घेऊयात...
रोहितचा कोणता मित्र अडचणीत आला?
रोहित शर्मामुळे भारतीय संघाचे नवनियुक्त मुख्य निवडकर्ता प्रज्ञान ओझा यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. ज्युनियर क्रिकेटच्या दिवसांमध्ये रोहित आणि प्रज्ञान ओझा या दोघांची गट्टी जमली होती. पण आज रोहित आणि प्रज्ञान हे दोन जीवलग मित्र एका अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत सापडले आहेत, जी भारताला पुढील वर्षीच्या एकदिवसीय वर्ल्डकपआधी सोडवावीच लागेल. रोहित शर्माच्या फलंदाजीतील सातत्याने खालावत असलेल्या कामगिरीमुळे चिंता वाढली आहे. एकीकडे कामगिरी खालावत असताना दुसरीकडे संघाकडून खेळत राहण्याच्या रोहितच्या दृढनिश्चयामुळे प्रज्ञान समोर मैत्री की संघाला प्राधान्य असा पेच निर्माण झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतील वर्ल्डकपसारख्या सर्वात मोठ्या स्पर्धेसाठी भारतीय संघात आपले स्थान निश्चित करण्याकरिता केवळ रोहितची खेळण्याची आवड पुरेशी ठरेल की कामगिरीच्या आधारे त्याला निवृत्तीची सक्ती करावी? याचं उत्तर मित्र असलेल्या प्रज्ञानलाच शोधावं लागेल.
निवृत्तीसंदर्भात प्रज्ञानने एकदा घेतलीय रोहितची भेट
प्रज्ञान भारतीय संघात रोहितसोबत अनेक सामने खेळला आहे. राष्ट्रीय संघाबरोबरच 'आयपीएल'मध्ये रोहित आणि प्रज्ञान 'डेक्कन चार्जर्स' आणि नंतर 'मुंबई इंडियन्स'कडूनही एकत्र खेळले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, तत्कालीन मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या सांगण्यावरून इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी प्रज्ञानने रोहितची भेट घेतली होती. लॉर्ड्सवर निवृत्त होण्याच्या प्रस्तावावर रोहित विचार करेल का, हे पाहणे हा या भेटीचा उद्देश होता. तथापि, रोहितला हा प्रस्ताव आवडला नाही आणि त्याने भारतीय क्रिकेटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपली नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे आगरकर यांच्यासोबत त्याचे संबंध अत्यंत कटू झाले आणि ते आगरकर पद सोडेपर्यंत तसेच राहिले.