Virat Kohli Autograph Incident IND VS NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जाणार आहे. यातील चौथा वनडे सामना हा शुक्रवार १३ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. यापूर्वी भारतीय संघ आदल्यादिवशी सामना होणाऱ्या माउंट माउंगानुईच्या बे ओवल मैदानावर सराव करत होते. यात रोहित विराट अशा दिग्गज स्टार खेळाडूंचा समावेश होता. सराव पूर्ण झाल्यावर अनेक फॅन्स विराट कोहलीला भेटण्यासाठी त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी तेथे पोहोचले. काहींनी आपलं पुस्तक, कपडे, क्रिकेट बॅट, बॉल इत्यादींवर विराट कोहलीचा ऑटोग्राफ घेतला. यादरम्यान एक व्यक्ती हुशारीने विराटकडे आला आणि त्याला आपल्या एका वस्तूवर विराटचा ऑटोग्राफ हवा होता, मात्र विराटने त्यावर ऑटोग्राफ देण्यास नकार दिला.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये विराट सर्व संपल्यावर आपल्या फॅन्सला ऑटोग्राफ देताना दिसत आहे. एका व्यक्तीला विराट त्याच्या टोपीवर ऑटोग्राफ देतो. त्यानंतर एक फॅन त्याच्याजवळील एक वस्तू पुढे करून विराटला त्यावर ऑटोग्राफ द्यायला सांगतो. विराट ती वस्तू काळजीपूर्वक पाहतो आणि हळूच स्मितहास्य करून त्यावस्तूवर ऑटोग्राफ न देता ती पुन्हा त्याव्यक्तीकडे सोपवतो.
विराटने ऑटोग्राफ देणं का टाळलं?
सर्वांना ऑटोग्राफ देणारा विराट कोहली एका विशिष्ट व्यक्तीला ऑटोग्राफ देण्यास का नकार देतो? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओनुसार, विराटने त्या व्यक्तीला म्हटले, 'तू हा ऑटोग्राफ घेशील आणि नंतर ती वस्तू चढ्या किंमतीत विकून टाकशील'. फॅनला ज्या वस्तूवर त्याचा ऑटोग्राफ हवा होता ती वस्तू कोहलीच्या लहान पुतळ्यासारखी प्रतिकृती असल्याचे दिसते. अशा प्रकारची उत्पादने बाजारात विक्रीसाठीही उपलब्ध असतात. विराटला शंका होती की हा फॅन यावर त्याचा ऑटोग्राफ घेऊन तो पुढे चढ्या दराने विकेल, त्यामुळे विराटने त्यावर ऑटोग्राफ देण्यास नकार दिला.
Virat Kohli refused to give an autograph on his comic-like toy. He said "You're going to sell it for a higher price". https://t.co/JfDVQwPdSV
भारत न्यूझीलंड वनडे सीरिज :
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात असून यातील तीन सामन्यांपैकी दोन सामने हे भारताने जिंकलेत तर तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे सध्या टीम इंडिया सीरिजमध्ये 2-0 अशा आघाडीवर आहे. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाल्याने न्यूझीलंडकडे सीरिजमध्ये आघाडी घेऊन ती जिंकण्याची संधी नाहीये. मात्र उर्वरित दोन्ही सामने जिंकून न्यूझीलंड संघ सीरिजमध्ये बरोबरी साधू शकतो. तर भारताने उर्वरित दोन पैकी एक सामना जिंकून सीरिजमध्ये विजयी आघाडी घेण्याची संधी आहे.