Javed Miandad And Balasaheb Thackeray Meet : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 14 वी पुण्यतिथि आहे. यानिमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग त्यांच्यावर प्रेम करणारी त्यांना फॉलो करणारी माणसं शेअर करत असतात. बाळासाहेब ठाकरे हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठं काम करत होतेच मात्र यासोबतच त्यांना कला आणि खेळात सुद्धा रस होता. अशातच आठवतो तो किस्सा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधांवरून बाळासाहेब ठाकरे यांची अत्यंत आक्रमक आणि कठोर भूमिका असताना मुंबईतील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या 'मातोश्री' वर 30 जुलै 2004 रोजी पाकिस्तानचा क्रिकेटर जावेद मियांदाद याने त्यांची भेट घेतलेली.
काय होतं भेटीचं कारण?
बाळासाहेब ठाकरे आणि पाकिस्तानचा क्रिकेटर जावेद मियांदाद यांची भेट ही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष यांच्या पुढाकाराने झाली असल्याचे तेव्हाच्या काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर येते. शिवसेनेने पाकिस्तानी खेळाडूंना कोणत्याही स्पर्धेसाठी किंवा सामन्यांसाठी मुंबईत खेळू द्यायचे नाही अशी आक्रमक भूमिका घेतली होती. तेव्हा पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतात खेळण्याची संधी मिळावी, अशी विनंती करण्याचाही या भेटीमागे उद्देश होता. तसेच बाळासाहेब ठाकरे हे क्रिकेटचे मोठे चाहते होते. राजकीय मतभेद बाजूला सारून क्रिकेटर जावेद मियांदाद याचा खेळ बाळासाहेबांना आवडला होता. यात विशेषतः 8 एप्रिल 1986 रोजी शारजाह येथे झालेला भारत-पाकिस्तान ऑस्ट्रेलेशिया कपचा अंतिम सामना बाळासाहेबांच्या लक्षात होता. या सामन्यात मियांदादने चेतन शर्माच्या बॉलवर सिक्स ठोकला होता. यावेळी बाळासाहेबांनी जावेद मियांदाद याच त्यांच्या निवासस्थानी चांगलं आदरातिथ्य केलं.
जावेद मियांदाद हा त्याच्या एका टेलिव्हिजन चॅनल असाइनमेंटसाठी तेव्हा भारतात आलेला. तेव्हा तो कोलकाता, दिल्ली, मुंबई अशा विविध ठिकाणी कार्यक्रम करत होता.
भेटीनंतर काय म्हणाले बाळासाहेब ठाकरे?
बाळासाहेब ठाकरे आणि पाकिस्तानचा क्रिकेटर जावेद मियांदाद यांची भेट झाल्यावर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना बाळासाहेब म्हणाले होते की, 'जावेद मियांदाद हा क्रिकेटपटू म्हणून मला आवडतो. 1986 मध्ये शारजाह येथे त्याने चेतन शर्माच्या गोलंदाजीवर मारलेला उंच सिक्स मी कधीही विसरू शकत नाही.
भेटीनंतर काय म्हणाला जावेद मियांदाद?
बाळासाहेब ठाकरे आणि पाकिस्तानचा क्रिकेटर जावेद मियांदाद यांची भेट झाल्यावर मियांदाद म्हणाला की, 'बाळासाहेब हे क्रीडाप्रेमी आहेत, हे सहज लक्षात येते. लोक त्यांच्याबद्दल जसे बोलतात, तसे ते नाहीयेत. भेट घेऊन मला खूप छान वाटलं. बाळासाहेबांचे प्रेम आणि शुभेच्छा घेऊन मी पाकिस्तानला परत जाईन. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य यांना एक छोटी बॅट सुद्धा मियांदादने भेट दिली होती.
पाकिस्तानी क्रिकेट संघाला मुंबईत खेळू देणार नाही यासाठी आक्रमक असलेले बाळासाहेब ठाकरे आणि पाकिस्तानचा क्रिकेटर जावेद मियांदाद यांची झालेली ही भेट त्यावेळी खूप चर्चेचा विषय ठरलेली होती.