सुरक्षित गुंतवणुकीसोबत चांगला परतावा मिळवण्याचा विचार करणाऱ्यांसाठी बँक एफडी, पीपीएफ, एनएससी, एससीएसएस आणि पोस्ट ऑफिसच्या योजना हे लोकप्रिय पर्याय आहेत. ऑक्टोबर-डिसेंबर 2026 या तिमाहीत केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांचे व्याजदर कायम ठेवले आहेत. त्यामुळे सध्या कोणत्या योजनेत किती व्याज मिळत आहे, याची तुलना करणे महत्त्वाचे ठरते.
सध्या पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये एससीएसएस आणि सुकन्या समृद्धी योजनेवर 8.20% वार्षिक व्याज मिळत आहे. एनएससीवर 7.70%, पीपीएफवर 7.10%, तर 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर 7.50% व्याज आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या तिमाहीसाठी हे दर मागील तिमाहीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत.
पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा दीर्घकालीन बचतीसाठी लोकप्रिय पर्याय आहे. सध्या पीपीएफ वर 7.10% वार्षिक व्याज मिळत आहे. या योजनेचा कालावधी 15 वर्षांचा असल्याने अल्पकालीन गुंतवणुकीपेक्षा दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी तो अधिक योग्य ठरू शकतो. त्यामुळे निवृत्ती किंवा दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी PPFचा विचार केला जातो.
सिनीअर सिटीझन सेव्हिंग स्किम्स (SCSS) मध्ये सध्या 8.20% व्याज मिळत आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीत नियमित उत्पन्नाचा विचार करणाऱ्या पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना महत्त्वाची ठरते. दुसरीकडे, एनएससीवर 7.70% आणि 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस ठेवीवर 7.50% व्याज मिळत आहे. त्यामुळे केवळ व्याजदराच्या दृष्टीने एससीएसएस सध्या या प्रमुख सरकारी बचत पर्यायांमध्ये आघाडीवर आहे.
2 ऑक्टोबर 2026 च्या उपलब्ध आकडेवारीनुसार एसबीआय आणि एचडीएफसी बँकेच्या 1-2 वर्षांच्या FDवर सुमारे 6.45%, आयसीआयसीआय बँकेवर 6.30%,एक्सिस बँकेवर 6.50% आणि कोटक बँकेवर 6.65% व्याज आहे. काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये हा दर 6.60% पर्यंत आहे. मात्र काही स्मॉल फायनान्स बँका आणि इतर ठेवीदार संस्थांमध्ये यापेक्षा जास्त दर मिळू शकतात. त्यामुळे FD करताना फक्त आपल्या बँकेचा दर पाहण्याऐवजी इतर पर्यायांची तुलना करणे महत्त्वाचे आहे.
उच्च व्याजदर म्हणजे प्रत्येक गुंतवणूकदारासाठी सर्वोत्तम पर्याय असे नाही. गुंतवणुकीचा कालावधी, पैसे कधी लागणार आहेत, कराचे परिणाम, पैसे काढण्याची सुविधा, गुंतवणुकीची मर्यादा आणि जोखीम यांचाही विचार करावा. उदाहरणार्थ, पीपीएफ दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी आहे, तर एफडी तुलनेने अधिक लवचिक ठरू शकते. सध्या सरकारी छोट्या बचत योजनांचे दर आकर्षक असले तरी भविष्यात सरकारकडून त्यात बदल होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे.