वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी डाएटचा मार्ग अवलंबला असणार. कधी अगदी डॉक्टरांच्या सल्ल्याने तर कधी स्वत: खाण्यावर नियंत्रण ठेऊन वजन कमी होतंय का हे पाहण्याचा प्रयत्न आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी केला असेल. मात्र डाएट केलं की वजन कमी होतं या विचाराला छेद देणारं एक संशोधन समोर आलं असून यामधून एक वेगळाच ट्रेंड समोर आलाय आहे. नेमकं हे संशोधन काय आणि कोणती माहिती समोर आलीये ते पाहूयात...
नेमकं संशोधन काय आणि कोणी केलंय?
गेल्या काही वर्षात वजन कमी करण्यासाठी साध्या डाएटऐवजी कॅलरी कमी करणाऱ्या डाएटचा ट्रेंड प्रचंड लोकप्रिय झाला आहे. मात्र, अशा डाएटमुळे सुरुवातीला वजन वेगाने घटत असले, तरी असा डाएट दीर्घकाळासाठी कायम ठेवणे आव्हानात्मक असते. त्यामुळेच असं डाएट मध्येच सोडून दिल्यास बहुतांश लोकांचे वजन पुन्हा वाढू लागते, असा निष्कर्ष ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ वॉलोंगॉन्गच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून समोर आला आहे.
ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ वॉलोंगॉन्गच्या संशोधनांनुसार, कॅलरी सेवन नियंत्रित ठेवल्याने वजन, कंबर कमी होण्यास मदत होते. याशिवाय रक्तातील शर्करा म्हणजेच साखरेचे प्रमाण व कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. परिणामी, टाइप-2 मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका कमी होतो.
काय आहे कॅलरी कमी करणारे डाएट?
कॅलरी घटवणाऱ्या डाएटमध्ये व्यक्ती आपल्या दैनंदिन आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेचे (कॅलरी) प्रमाण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करते. यामध्ये दिवसातील विशिष्ट वेळेतच जेवणे, एक दिवस सोडून म्हणजेच दिवसाआड अतिशय कमी कॅलरी घेणे आणि 'फास्ट 800' सारख्या डाएट पद्धतींचा समावेश आहे. 'फास्ट 800' डाएट पद्धत ही प्रसिद्ध ब्रिटिश डॉक्टर आणि पत्रकार डॉ. मायकेल मोस्ले यांनी विकसित केली आहे. यात प्रामुख्याने भूमध्य-शैलीतील आहार (Mediterranean Diet) आणि इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजेच अधूनमधून उपवास करण्याच्या माध्यमातून वजन कमी केलं जातं.
शरीर जितकी ऊर्जा खर्च करते, त्याहून कमी कॅलरी आहारातून घेतल्यास ते शरीरातील साठवलेली चरबी वापरू लागते व वजन कमी होते, असं या मागील शास्त्र आहे. अशा पद्धतीचं डाएट वैद्यकीय देखरेखीखाली केले जाते.
वजन वाढण्याची कारणं
असं कॅलरी कमी करणारे डाएट वजन वाढण्याची कारणं समजून घेऊयात...
संप्रेरकांमधील (हार्मोन्समधील) बदल : वजन कमी होताच भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स बदलतात व भूक वाढू लागते. म्हणजेच शरीरातील संप्रेरकांमधील बदल झाल्याने वजन वाढते.
ऊर्जेचा कमी वापर : वजन कमी झाल्यामुळे शरीर कमी ऊर्जा खर्च करते, ज्यामुळे वजन कमी होण्याचा वेग मंदावतो.
इच्छाशक्तीचा आभार : बाजारात अतिप्रक्रिया केलेले अन्न स्वस्त व सहजरीत्या उपलब्ध असल्याने इच्छाशक्ती टिकवून ठेवणे कठीण जाते.
मानसिक व शारीरिक परिणाम : सतत लागणाऱ्या भुकेमुळे मूड बदलणे, झोपेवर परिणाम होतो.
तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला काय?
आहारात पुरेसे प्रथिने व भाज्या, डाळी, कडधान्ये असे फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. मीठ, अतिरिक्त साखर, स्निग्ध पदार्थ व मद्यपान कमी करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. जेवणाचे प्रमाण नियंत्रित ठेवावे, नियमित व्यायाम करावा व भुकेच्या नैसर्गिक संकेतांकडे अधिक लक्ष द्यावे.