पाकिस्तानचे 77 वर्षीय संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ सध्या टीकेचे धनी ठरत आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानी लोकांकडूनच त्यांच्या संरक्षण मंत्र्यांविरोधात टीकेचा भडीमार केला जात आहे. यासाठी कारण ठरली आहे ख्वाजा आसिफ यांनी त्यांच्या अधिकृत 'एक्स' हॅण्डलवरुन शेअर केलेली पोस्ट! या पोस्टमध्ये त्यांनी जगातील सर्वात मादक महिला अशी ओळख असलेल्या अभिनेत्रीचा एक एआय जनरेटेड फोटो शेअर केला आहे. खरं तर ही पोस्ट एक कोडं असून त्याचे उत्तर देण्याच्या नादात पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी हा बोल्ड फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये आता ते वादाच्या भोवऱ्यात साडलेत. पाकिस्तान सध्या अनेक आघाड्यांवर अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानांचा सामना करत असताना, ख्वाजा आसिफ यांच्यासारख्या एका वरिष्ठ मंत्र्याने अशा प्रकारची 'निरर्थक' पोस्ट शेअर करणे किती योग्य आहे, असा प्रश्न आता सोशल मीडियावर पाकिस्तानी चाहत्यांकडूनच उपस्थित केला जातोय.
काय आहे पोस्टमध्ये?
ख्वाजा आसिफ यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला 'एक्स'वर एआयवरुन तयार करण्यात आलेलं एक कोडं शेअर केलं. या कोड्याच्या फोटोमध्ये हॉलिवूडमधील सर्वात मादक अभिनेत्री मर्लिन मनरो दिसत आहे. 1956 सालातील बँकग्राऊड असलेल्या या फोटोमध्ये मार्लिन मनरोला एआय माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. फोटोमध्ये मार्लिनच्या काळाशी विसंगत असलेली एक गोष्ट शोधण्याचे आव्हान करण्यात आले होते. या एआय फोटोमध्ये मर्लिन मनरो शॉर्ट्स आणि क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे, त्या काळात अस्तित्वात नसलेले एक आधुनिक 'स्मार्टवॉच' तिने मनगटावर बांधलं आहे. त्या काळातील नसलेलं घड्याळ हेच या कोड्याचं उत्तर आहे.
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी काय लिहिले?
आसिफ यांनी शॉर्ट्स आणि क्रॉप टॉपमध्ये मार्लिन मनरोचा फोटो असलेल्या या कोड्याची पोस्ट ख्वाजा आसिफ यांनी रीपोस्टच्या माध्यातून शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना केवळ एका शब्दाची कॅप्शन त्यांनी या फोटोला दिली असून एक इमोजी वापरला आहे. ख्वाजा आसिफ यांनीनी 'वॉच' असं लिहून हे कोडं शेअर केलं असून सोबत हसरा इमोजी वापरला आहे.

या पोस्टवरुन टीका का?
पाकिस्तानमधील अनेक युझर्सने या पोस्टवरुन आपल्याच संरक्षण मंत्र्यांवर टीका केली. देशाचे संरक्षण मंत्री 'एक्स'वर एआय कोडी सोडवून का शेअर करत आहेत, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. एकाने, "पाकिस्तान आर्थिक, राजकीय आणि सुरक्षेसंदर्भातील संकटात बुडालेला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांत अंतर्गत अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत, देशाचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ मात्र स्वतः एका फेक 'अमेरिकन वुमन' अकाउंटला प्रोत्साहन देण्यात व्यस्त आहेत," असं म्हणत टीका केली आहे. काहींनी तर 77 वर्षीय ख्वाजा आसिफ यांना म्हातारचळ लागल्याचा टोला लगावलाय. अनेकांनी यावरुन ख्वाजा आसिफ यांना ट्रोल करणारे रिल्सही तयार केलेत. असेच एक रील खाली पाहा...
अन्य एकाने, "कदाचित पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ आपले अकाउंट बदलायला विसरले असावेत," असं म्हणत टोला लगावला आहे. "युद्ध वगैरे तर होतच राहील, पण मर्लिन मनरोकडे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे," असा टोमणा अन्य एकाने लागवलाय. अनेकांना ख्वाजा आसिफ यांची ही पोस्ट अत्यंत अनप्रोफेश्नल वाटली.