Amla Benefits : आवळा घरात विविध कारणांसाठी वापरला जातो. त्याच्या सेवनाचे शरीरासाठी सुद्धा अनेक फायदे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाच्या 138 व्या एपिसोडमध्ये उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये आवळ्या विषयी सुरु असलेल्या कामांविषयी त्यांनी यात सांगितलं. प्रतापगडमध्ये आवळा कँडी, मुरंबा, ज्यूस, लोणचं इत्यादी बनवलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की आवळा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो, कारण त्यात 'व्हिटॅमिन सी'सारखी आवश्यक पोषक तत्वे असतात. तेव्हा आवळ्याच्या सेवनामुळे शरीराला होणारे फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊयात.
शरीराला मिळतं व्हिटॅमिन सी :
आवळ्यात व्हिटॅमिन सी आढळतं जे शरीरासाठी अत्यंत पोषक ठरतं आणि सामान्यपणे ते शरीरातील रोगांशी लढण्यासाठी मदत करते. व्हिटॅमिन सी शरीरात अँटीऑक्सिडंट म्हणूनही कार्य करते. तसेच, ते कोलेजेनच्या निर्मितीस मदत करते, जे त्वचा आणि शरीराच्या इतर भागांसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आहारात आवळ्यासारख्या फळांचा समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
पचनक्रिया चांगली राहते :
आवळ्यात फायबर असतं जे पोटासाठी आवश्यक ठरतं. खाण्यात पुरेसं फायबर असेल तर मल त्याग हा सामान्य राहण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या टाळण्यासही मदत होऊ शकते. मात्र जर एखाद्या व्यक्तीला जुनाट बद्धकोष्ठता किंवा पचनसंस्थेशी संबंधित एखादा विकार असेल, तर केवळ आवळा खाणे हा त्यावर उपाय ठरणार नाही. त्यामुळे याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
केसांसाठी फायदेशीर :
आवळ्यात व्हिटॅमिन सी सह इतरही पोषकतत्व असतात जे केसांसाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे केसांसाठी आवळ्याचा वापर हा अनेक वर्षांपासून केला जातोय. आवळ्याच्या सेवनामुळे केस गळणे थांबणे, नवीन केस उगवणे इत्यादी फायदे होतात. मात्र याविषयी ठोस सांगता येणार नाही. तेव्हा अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.
त्वचेसाठी फायदेशीर :
आवळ्यात असलेल्या व्हिटॅमिन सी त्वचेसाठी सुद्धा गरजेचं असून यामुळे शरीरात कोलेजन बनवण्यास सुद्धा मदत होते. हेच कोलेजन त्वचेला स्वस्थ बनण्यासाठी सुद्धा मदत करते. याच कारणामुळे आवळ्याचा संबंध अनेकदा त्वचेच्या आरोग्याशी जोडला जातो. मात्र केवळ आवळा खाल्ल्याने चेहऱ्यावरील त्वचेच्या सर्व समस्या दूर होतील असा दावा करता येणार नाही. कारण निरोगी त्वचेसाठी संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि पुरेशी झोप घेणेही तितकेच आवश्यक आहे.