कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रतिष्ठेची बनलेली गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार राजेश पाटील यांची निवड झाली आहे. महायुतीच्या या विजयामुळे सतेज पाटलांना जोरदार धक्का बसला आहे. राजेश पाटील यांनी सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत चुयेकर यांचा 16 विरुद्ध 13 मतांनी पराभव करत गोकुळ संघावर महायुतीची सत्ता आली आहे. अध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर राजेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना मोठी घोषणा केली.
अध्यक्षपदी निवडणूक झाल्यानंतर राजेश पाटील म्हणाले की, 63 वर्षानंतर चंदगड सारख्या डोंगराळ, दुर्गम भागाला आज गोकुळमध्ये प्रतिनिधीत्व मिळालं. या भागातून चांगल्या प्रतीच्या दुधाचा गोकुळला पुरवठा आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहेत. आज खऱ्या अर्थाने हसन मुश्रीफ यांच्यासारख्या नेत्यांनी माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या खांद्यावर गोकुळची जबाबदारी सोपवली आहे. मला विश्वास आहे की या वर्षभराच्या कार्यकारभात या सर्व 25 संचालक, चार शासन नियुक्त संचालक आणि दोन स्वीकृत संचालक असे 31 जण मिळून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करु. गोकुळचं वैभव कशाप्रकारे वाढवता येईल यासाठी मी प्रयत्न करेल. गोकुळला देशपातळीवर कशी नेता येईल यासाठी प्रयत्न करणार. गेल्या वर्षभरातला तोटा भरून काढण्यासाठी नियोजन करु.
विरोधकांना उद्देशून राजेश पाटील म्हणाले की, पुढच्या महिन्यात या संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी लागणार आहे. माझी सर्व मंडळींना विनंती आहे की, ज्यांनी निवडणुकीच्या वेळी विरोधक म्हणून लढलेले आहेत. निवडणुका संपलेल्या आहेत, अध्यक्षपदाची निवड झाली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक झाली आहे. आता राजकारण करण्यापेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय तुम्ही आणि आम्ही सर्वांनी हातात हात घालून करणे गरजेचे आणि अपेक्षित आहे असं मला वाटतं. झालं गेलं सगळं विसरून एक दिलाने एक मनाने गोकुळ आणि सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचं कार्य इथून पुढील पाच वर्षांमध्ये करूयात.