ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, कोर्ट परिसरात सुद्धा हाय अलर्ट जाहीर
Thane Municipal Corporation Bomb Threat : ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी गुरुवारी प्राप्त झाली आहे. 26 नोव्हेंबर रोजी ही धमकी मिळाली असून तात्काळ पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून महापालिकेची इमारत रिकामी करण्यात आली.
Thane Municipal Corporation Bomb Threat : मागील काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या उपनगरातील सरकारी कार्यालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली जात आहे. २६ नोव्हेंबर रोजी आता ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी तात्काळ दखल घेत पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला असून सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली असून काहीवेळासाठी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झालं आहे.
मुख्यालयासह सर्व प्रभाग समित्यांनाही देण्यात आला अलर्ट :
ठाणे महापालिकेलाही धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यावर तात्काळ संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. बॉम्ब शोधक पथकाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली असून ठाणे महापालिकेला बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाल्यावर सर्वत्र घबराटीचं वातावरण निर्माण झालं. मुख्यालयासह ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समित्यांनाही अलर्ट देण्यात आला असून पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.
मुंबई महापौर कार्यालयाला सुद्धा मिळालेली धमकी :
मुंबईच्या महापौर कार्यालयाला पुन्हा एकदा धमकीचा मेल आहे. महापौर कार्यालयाला पाचव्यांदा धमकीचा ईमेल आल्यानं खळबळ उडाली आहे. मुंबईत दुपारी बॉम्ब हल्ला घडवण्याची धमकी तसंच अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. महालक्ष्मी परिसरासह मेट्रो स्टेशन्स उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. फक्त मुंबईच नाहीतर नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर कोर्टालाही बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
दलजीत दोसांझ कॉन्सर्टला निशाणा बनवण्याची धमकी :
मुंबई आणि उपनगरातील प्रशासकीय कार्यालयासोबतच 27 तारखेला मुंबईमध्ये आयोजित दलजीत दोसांझ कॉन्सर्टला सुद्धा निशाणा बनवलं जाणार असल्याची धमकी देण्यात आलेली आहे. पोलीस सायबर टीमच्या मदतीने ईमेलच्या आयपी ऍड्रेसची तपासणी करत आहे. यापूर्वी सुद्धा दलजीत दोसांझ कॉन्सर्टमध्ये बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आलेली होती.