)
कसारा-मनमाड तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचा प्रकल्प मार्गी लागणार असून प्रकल्पासाठी नाशिकसह पाच तालुक्यांतील ४५ गावांमधील जमिनींचे अधिग्रहण होणार आहे. एकूण ३३४ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामुळे मुंबई-नाशिक रेल्वे प्रवासाचा वेग आणि प्रवासी क्षमता वाढणार आहे. प्रकल्पामुळे मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रा दरम्यान रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. कसारा-मनमाड दरम्यान २४ किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्यात येणार आहे. रेल्वे मार्गावर २१ रेल्वे भुयारी मार्गांची उभारणी होणार आहे. प्रकल्पात २३९ पुलांसह पाच बोगद्यांचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १० हजार १४५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पुढील पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रवासी वाहतुकीसोबत मालवाहतुकीलाही मोठा फायदा होणार आहे.
कोलकाता मुंबई एअर इंडिया विमान हायजॅक करण्याची धमकी देण्यात आली असून विमान उड्डाणापूर्वी हायजॅकची धमकी देणारी चिठ्ठी आढळल्याची माहिती आहे. विमानाच्या कॅप्टनकडून एटीसीला घटनेची माहिती आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विमानातील सर्व प्रवाशांना उतरवले. विमान आयसोलेशन बेमध्ये हलवण्यात आले. विमानाची सुरक्षा तपासणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
मंत्री गणेश नाईक यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या पावनगड बंगल्याला आग लागली आहे. अग्निशामक दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.
दिवाळी पाडव्याच्या मंगल पर्वावर नागपुरातील स्वामीनारायण मंदिरात अन्नकुट महोत्सव पार पडला. यावेळी शेकडो खाद्यपदार्थ, मिठाईचे नानाविध प्रकार आणि पंचपकवानांची सुबक सजावट करण्यात आली होती. अन्न हे केवळ उदरभर्णाचे साधन नसून ईश्वराचा प्रसाद आहे या श्रद्धेचा प्रत्यय देणारा हा सोहळा ठरला. यावेळी मंदिराचे सभागृह फुलांच्या आरसीने सजविण्यात आले होते. या अन्नकुट महोत्सवाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती.
धनादेश न वठल्या प्रकरणी सांगली न्यायालयाने एका आरोपीस सहा महिन्यांची तुरंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. सांगलीतील एका व्यक्तीकडून इचलकरंजी येथील आरोपीने ओळखीने वैयक्तिक कानासाठी तीन लाख रुपये हात उसने घेतले होता,त्याबाबतचा लेखी करार देखील केला होता.रक्कम परतफेडीपोटी धनादेश दिला होता,बॅंकेत न वठल्याने,आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्याने संबंधित व्यक्तीने सांगली न्यायालयामध्ये धाव घेतली होती,या प्रकरणी सांगली न्यायालयाने इचलकरंजी येथील ओंकार बडवे यास दोषी ठरवत सव्वा तीन लाख भरपाईचे आदेश देत आरोपीस सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे.
फटाके फोडण्याच्या वादातून पालघरच्या तामसईमध्ये एका कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गोठ्यात बांधलेले बैल फटाक्यांच्या आवाजाने घाबरत असल्याचे कारण देत सुरू झालेला वाद अखेर हाणामारीत बदलला. आजूबाजूच्या लोकांनी एकत्र येत एकाच कुटुंबातील सदस्यांना लाकडी दांडक्याने आणि ठोश्याबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत कुटुंबातील वृद्ध व्यक्तीसह इतर सदस्य जखमी झाले आहेत. ९ नोव्हेंबरच्या रात्री सुरू झालेल्या वादानंतर १० नोव्हेंबर रोजी पुन्हा मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी सहा जणांविरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मनोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढला असून, निफाडचा पारा थेट १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. गुलाबी थंडीचे आगमन झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, पहाटे आणि सकाळी थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत दरम्यान, वाढत्या थंडीचा रब्बी हंगामातील पिकांनाही फायदा होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
उदगीर तालुक्यातील जकणाळ येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुण कामगाराचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नारायणा ॲग्रो ऑईल मिलमध्ये काम करणारा लक्ष्मण कुमार हा तलावात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या खिर्डी येथे गोठ्याला आग लागल्याची घटना घडली असून राजकुमार दिगंबर महाजन यांच्या गोठ्याला रात्रीच्या सुमारास ही आग लागल्याने गोठ्यातील ठिबक सिंचन व इतर शेती साहित्यासह गोठ्यातील सागवानी लाकूड जळून खाक झाले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले असून या घटनेत मात्र शेतकरी राजकुमार महाजन यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
नैसर्गिक आपत्ती आणि पावसाच्या लहरीपणामुळे वाशिम जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.उत्पादनात घट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून,शासनाने जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर विमाधारक शेतकऱ्यांना कोणतेही जाचक निकष न लावता सरसकट पीक विम्याची भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा दिलासा मिळणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आधीच शेतीतील संकटांमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला आता आगीचा फटका बसलाय. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथे शॉर्टसर्किटमुळे शेतकरी युनूस शहा यांच्या घराला आग लागली. या आगीत शेतीसाठी नव्याने खरेदी केलेले पाईप, स्प्रिंकलर आणि अन्य साहित्य जळून खाक झाले असून, सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी युनूस शहा दुलू शहा यांनी शेतीच्या कामासाठी नुकतेच नवीन पाईप आणि स्प्रिंकलर साहित्य खरेदी केले होते. हे साहित्य घराच्या वरच्या माळ्यावरील गॅलरीत ठेवले असताना अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि या आगीत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून, अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतीच्या हंगामासाठी मोठ्या अपेक्षेने खरेदी केलेले साहित्य आगीत नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अपुऱ्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून, कारंजा तालुक्यातील कामरगावकरांची तहान भागविणाऱ्या उंदरी लघु प्रकल्पात अवघा २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे आगामी उन्हाळ्यात कामरगावला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.पुढील पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरविण्याचे आव्हान असताना ग्रामपंचायत आणि प्रशासनाने आतापासूनच पाणी नियोजन करावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दिवाळीच्या दिवशी नागपूरातील सर्वश्रीनगर परिसरात एका मांजरीला झाडाला फास लावून ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जादूटोण्याच्या संशयातून हा प्रकार घडल्याची अफवा परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागरिकांनी मांजरीच्या गळ्यातील फास काढून त्यांनी तिला जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दिवाळीच्या आनंदोत्सवात पाडव्याच्या उत्साहानंतर भाऊ-बहिणीच्या जिव्हाळ्याचे प्रतीक असलेली भाऊबीज उत्साहात साजरी केली जाते अमरावतीमध्ये काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी यशोमती ठाकूर आणि काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांच्यात भाऊबीज उत्साहात पार पडली. यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखडे यांना औक्षवंत करत ओवळणी घातली. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी बळवंत वानखडे यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले. बळवंत वानखडे यांनी यशोमती ठाकूर यांना साडी भेट दिली. यावेळी यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आज माझा भाऊ खासदार आहे उद्या अजून त्यापेक्षाही मोठे झाले पाहिजे अशी प्रार्थना करतो. बळवंत दादा आवर्जून दरवर्षी घरी येतात. एक भावनिक नातं आमच्यामध्ये आहे. माझा भाऊ सुखरूप राहिला पाहिजे अशी देवाचरणी प्रार्थना असं त्यांनी म्हटलं.. तर आमचं भाऊ बहिणीचं नातं आहे अशी प्रतिक्रिया बळवंत वानखडे यांनी दिली.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 11 november 2026: आज भाऊबीजेचा सण असून आज संपूर्ण देशात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. आज मकोका कोर्टात टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे आरोपींना हजार केलं जाणार आहे. गोकुळ दूध संघावर अखेर महायुतीची सत्ता आली असून अध्यक्षपदाच्या निवडीत महायुतीला 16 तर समविचारी आघाडीला 13 मतं मिळाली आहेत. तर राजेश पाटलांची अध्यक्ष म्हणून निवड झाली असून यामुळे सतेज पाटलांना मोठा धक्का बसलाय. तेव्हा यासह देश विदेश आणि तुमच्या शहरातील प्रत्येक महत्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेता येणार आहे.