मुंबईत साजऱ्या केल्या जाणाऱ्या छठपुजेवरुन आधीच वाद रंगलाय. समुद्रावर गणेशमुर्ती विसर्जनासाठी बंदी आणली तशी छठपुजेसाठीदेखील असावी, अशी मागणी करण्यात येतेय. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापलंय. भोजपुरी गाणी वाजवण्याच्या निर्णयावर ठाकरेंची शिवसेना, महाराष्ट्र एकीकरण समितीने टीका केली. तर भाजप भोजपुरीच्या गाणी वाजण्याच्या समर्थनार्थ उतरलीय. दुसरीकडे आता मनसेनं आक्रमक भूमिका घेतलीय.
मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर नेहमी तुम्हाला रेल्वे वेळापत्रकाच्या उद्घोषणा ऐकायला मिळतात. ज्यामध्ये रेल्वे कधी येणार, कोणत्या प्लॅटफॉर्मवर कोणती लोकल थांबेल, लोकल उशीरा येणार असेल तर अशा कारणांसाठी उद्घोषणा होतात. पण रेल्वे स्थानकांमध्ये थेट छटपूजेची गाणी वाजण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मुंबईत हार्बर मार्गावरील वडाळा, सानपाडा यासह मध्य रेल्वेच्या आंबिवली स्टेशनवर उद्घोषणा थांबवून छटपूजेची गाणी मोठ्या आवाजात वाजवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. ज्यामुळे मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. यामध्ये भाजप भोजपुरी गाणी वाजण्याच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिलीय. तर आता मनसेनं थेट आव्हान दिलंय.
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजल्यानंतर चहुबाजूने टीका करण्यात आली. यावर आता रेल्वेकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. नियमित उदघोषणांवर परिणाम झालेला नाही.नियमित उदघोषणेनंतर गाणी वाजवली जातायत, असं म्हणच रेल्वेनं या वादावर स्पष्टीकरण दिलंय.
भोजपुरी गाण्यांवरुन एकीकडे टीका होत असताना भाजपने याच्या समर्थनाथ भूमिका घेतलीय. भोजपुरी गाण वाजत असेल तर वाईट काय? असा प्रश्न अतुल लोंढे यांनी विचारलाय. एखाद्या प्लेटफॉर्म वर जर मराठी गाणं वाजले तर चांगली गोष्ट आहे, भोजपुरी गाण वाजत असेल तर त्यात वाईट काय? अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आलीय. भोजपुरी ही चांगली भाषा आहे, यात राजकारण काय करायचे, असा प्रतिप्रश्न अतुल लोंढे यांनी विचारला.
भोजपुरी गाण्यांवरुन ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात आलीय. खासदार संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीका केलीये. प्लॅटफॉर्मवर जय महाराष्ट्र लावणार नाही मात्र ही भोजपुरी गाणी नियमात बसतात का असा सवाल त्यांनी सरकारला विचारलाय. सण साजरे करताना मराठी अस्मितेला धक्का लागू नये याची काळजी घ्यावी अशी मागणी त्यांनी केलीये.. 'महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करु नका असा इशाराही राऊतांनी दिलाय.भोजपुरी गाण्यांवरुन किशोरी पेडणेकरांनीही सरकारला सुनावलंय. 'महाराष्ट्रात असले फाजील लाड कशाला?','यूपी, बिहारमध्ये महाराष्ट्र गीत लावलं जाईल का?' असा प्रश्न किशोरी पेडणेकरांनी विचारला. 'मराठीचा अभिजात दर्जा घालवण्याचा प्रयत्न असल्याची टीका किशोरी पेडणेकरांनी सरकारवर केलीय.
रेल्वे स्थानकावरील भोजपुरी गाण्यांविरोधात मनसे आक्रमक झालीय.'भोजपुरी गाणी बंद न केल्यास मनसे स्टाईलने उत्तर देऊ', असं मनसेनं म्हटलंय. 'सीएसएमटी रेल्वे स्थानकात अधिकाऱ्यांना बसू देणार नाही' असा इशारा मनसे रेल्वे कर्मचारी संघटनेच्या जितेंद्र पाटील यांनी दिलाय.
शहरातील सर्वच चौपाट्या, तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून परवानग्या नको,सार्वजनिक पर्यटन ठिकाणी स्थानिक नागरिकांची गैरसोय थांबवा
बिहारचा हा उत्सव खाजगी ठिकाणी साजरा करावा पर्यावरण मंत्र्यांनी लक्ष घालावे. मुंबई रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाणे लावणाऱ्या रेल्वेचे डोकं ठिकाणावर आहे का? तुम्ही मराठी राज्यात आहात भानावर या, आम्ही निषेध करतो. मुख्यमंत्री महोदय कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र? महाराष्ट्राचे बिहार का करताय? मतांच्या भिकेसाठी अजून काय काय करणार? मुंबई महाराष्ट्र विकायला काढला आहे का? असा प्रश्न गोवर्धन देशमुखांनी विचारलाय. राज्यकर्त्यांनी काय करून ठेवले आहे महाराष्ट्राचे आता चक्क बिहारमध्ये आणून सोडले आहे आम्हाला.महाराष्ट्रात भाषिक दंगे भडकवू नका, मराठी माणसाचा संयम पाहू नका.रेल्वेने तात्काळ भोजपुरी गाणी बंद करावी अन्यथा तुमचे कार्यालयात घुसून आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिलाय.