छटपूजेवरून महाराष्ट्रात चांगलंच राजकारण तापलं आहे. याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. छटपूजेवरून संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. भाजपचा फोडा आणि राज्य करा फॉर्म्युला चालणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.भाजपच्या सापळ्यात मराठी माणसानं अडकू नये असा सल्ला देखील राज ठाकरेंनी दिला आहे. यावर संजय निरुपम यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
छठ पुजेवरुन राजकीय वातावरण चांगलच तापलंय. राज ठाकरेंच्या खरमरीत टीकेला संजय निरुपमांनी प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे यांची ती लांबलचक एक्स-पोस्ट वाचून समजून घेण्याचा प्रयत्न केला. ती पूर्ण वाचल्यावर माझ्या मनात पहिला प्रश्न आला की, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? असा प्रश्न संजय निरुपम यांनी उपस्थित केला. या संपूर्ण घटनेचा उत्तर प्रदेश निवडणुकीशी काहीही संबंध नाही. निवडणुका येतील आणि जातील, पण छठ पूजा हजारो वर्षांपासून साजरी केली जात असल्याचेही निरुपम यावेळी म्हणाले.
छठ पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , तर शांत आहोत म्हणजे गां* नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे. उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत. आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते. येथे मरहट्टे राहातात ते, असे आवाहन राज ठाकरेंनी केले. भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा. मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा ! योग्य वेळी निर्णय घेऊ, असेही ते यावेळी म्हणाले.
छठ पूजेच्या विरोधात राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका पूर्णपणे आक्षेपार्ह आहे. भारतात, आपण सर्व वेगवेगळ्या भाषा बोलतो, आपल्या वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या ओळख, वेगवेगळ्या जीवनशैली आणि वेगवेगळ्या खाण्याच्या सवयी आहेत. प्रत्येकाच्या स्वतःच्या पूजा-अर्चा आणि सण असू शकतात. पण आपण सर्व एकमेकांवर प्रेम करतो आणि सलोख्याने एकत्र राहतो, असे निरुपम म्हणाले. जर कोणाला वाटत असेल की मुंबईतील छठ पूजेचा उत्सव हा महाराष्ट्रावरचा सांस्कृतिक हल्ला आहे, तर मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की गणेशोत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. तो दिल्ली, इंदूर, अहमदाबाद, बडोदा, पाटणा, लखनौ आणि जौनपूर येथे होतो. तर हा महाराष्ट्रावरचा सांस्कृतिक हल्ला आहे का? नाही. गणपती आपल्या सर्वांचा आहे. गणेशोत्सव आपल्या सर्वांचा आहे. संपूर्ण देशाचा, आपल्या सर्वांचा, अशी प्रतिक्रिया निरुपम यांनी दिली.
गिरगाव चौपाटीवर छटपूजेला हायकोर्टाने नकार दिलाय. 1998च्या आदेशानुसार ही परवानगी नाकारण्यात आलीय. धार्मिक स्वातंत्र्य मर्यादांच्या अधीन असल्याचे कोर्टाचे म्हणणे असून याप्रकरणी दिवाळीच्या सुटीनंतर सुनावणी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
छठपूजेवरुन मुंबईत सुरु असलेल्या वादात आता अभिनेता सोनू सूद यांनीही उडी घेतलीये. मुंबईती जुहू बीचवर छटपूजा साजरी करण्यास मनसेनं विरोध केला असताना आता 15 नोव्हेंबरला संध्याकाळी छटपूजेसाठी जुहू बीचवर येणार असून छटपूजा साजरी करणार असल्याचं सोनू सूदनं म्हटलंय. याबाबतचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. त्यामुळे यावरुन आता वाद रंगण्याची शक्यता आहे.