आधी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळणाऱ्या सुनील तटकरेंनी यू टर्न घेतला. अजितदादा आणि शरद पवारांमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा झाल्याचं मान्य केलं. हाच धागा पकडत शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. अजित पवारांच्या घातपातामागे सुनील तटकरेंचा हात आहे का? असा संशय व्यक्त करत चौकशी व्हायला हवी अशी मागणीही केली आहे. यादरम्यान पाडव्यानिमित्त सुनील तटकरे बारामतीत अजित पवारांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण आणि रामदास कदमांच्या आरोपांवर भाष्य केलं.
अजित पवारांशिवाय पाडव्याला बारामतीला येण्याचं दु:ख आहे. हे मनाला कधीच पटवू शकत नाही, पण नियतीपुढे कोणाचं चालत नाही अशी भावना यावेळी त्यांनी बोलून दाखवली. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, "विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सुनेत्रा वहिनी निर्णय घेतील. शरद पवार सहा दशकांपासून देशाच्या राजकारणात आहेत. ते त्यांचा निर्णय घेतील. गेले 3-4 दिवस मी दिवाळीनिमित्त खेडेगावात असतो आणि शुभेच्छा घेत असतो. काही घडामोड घडली असेल तर मला माहिती नाही. योग्य वेळी सर्वांशी चर्चा करुन त्यासंदर्भातील भूमिका मांडता येतील".
रामदास कदम यांच्या आरोपांवर त्यांनी जास्त भाष्य करण्यास नकार दिला. "रामदास कदम यांचं नाव घेऊन या पवित्र जागेचं महात्म्य कमी करायचं नाही. पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी करोडो वारकरी पंढरपूरला जात असतात. तसे माझ्यासारखे अनेक वारकरी आहेत जे बारामतीला पंढरी म्हणातत. त्यात पवार साहेबांपासून दादाही आहेत. कोणाचं तरी नाव ने घेता या श्रद्धेच्या स्थानाचं महत्व अबाधित ठेवायचं आहे". माझं दादांशी काय भानिवक नातं आहे हे फक्त बारामती, रोहेकरांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलं आहे असं उत्तर त्यांनी दिलं.
यावेळी त्यांनी अर्थखातं आम्हाला मिळालंच पाहिजे असं ठामपणे सांगितलं. "दादांनी विक्रमी अर्थसंकल्प राज्याला दिले. त्यांनी 11 अर्थसंकल्प मांडले. मधील काळात मी एक मांडला तो सोडून त्यांनी सलग अर्थसंकल्प सादर केले. महाराष्ट्रातील आर्थिक जडणघडणीत त्यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे अर्थमंत्रीपद आम्हाला मिळावं ही ठाम भूमिका आहे".
मी आज वहिनींना भेटणार आहे. येथे आल्यावर नेहमीच आईंचं दर्शन घेत असतो. काल मी त्यांना फोन करुन दादांशिवाय पाडवा असून आज येणार आहे अशी कल्पना दिली आहे अशी माहिती त्यांनी दिली. काही झालं तरी सिल्व्हर ओक आणि गोविंदबाग देशाच्या राजकारणाचं केंद्रबिंदू राहिलं आहे. दादा वास्तव्य करत असलेलं देवगिरी निवासस्थानही केंद्रबिंदू राहिलं आहे सांगत त्यांनी नेत्यांच्या भेटींवर भाष्य केलं.
"शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांची भेट नेहमी होत असते. 10 तारखेनंतरही भेटणार असतील तर त्यात काही वावगं नाही. शरद पवारांच्या प्रत्येक राजकीय भेटीचा अन्वार्थ वेगळा निघाला पाहिजे असा नाही. राजकारणातील पलीकडे नाती कशी जपावीत हे पवार साहेबांनीही दाखवलं आहे आणि मी माझ्या राजकीय आयुष्यातही जतन केलं आहे. ते ब्रीच कँडीत पाहायला गेले होते आणि स्वाभाविकपणे पुन्हा भेटतील. शरद पवारांची तब्येत लवकर बरं होणं महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी महत्त्वाचं आहे. सहा दशकाच्या वाटचालीत देशासाठी त्यांचं प्रचंड योगदान आहे," असं ते म्हणाले.