सुनील तटकरे यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दलच्या चर्चांना उधाण आलंय. शरद पवार यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे, अशा बातम्या समोर येत आहे. त्यामुळे विलिनीकरणाच्या बातम्यांना जोर आला आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत आमच्यासोबत चर्चा झालेली नाही. दोन्ही पक्षांकडून तशी चर्चा झाली तर प्रतिक्रिया देऊ. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्र पक्ष आहेत. त्यांच्या पक्षांचे निर्णय ते घेतील. त्यांच्या पक्षांबाबत आम्ही निर्णय घेणे किंवा त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.
ते पुढे म्हणाले की, मात्र, दोन्ही पक्षांना एकत्र येण्याबाबत काही निर्णय घ्यायचा असेल किंवा त्या संदर्भात चर्चा करायची असेल, तर ते आम्हाला विश्वासात घेतील. कारण एनडीएमधील भाजप हा सर्वात मोठा भागीदार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.