अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीने उधळला गुलाल! किरण सरनाईक यांचा सलग दुसऱ्यांदा विजय
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निकाल लागला असून, महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा दुसऱ्यांदा विजय झाला आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निकाल लागला असून, महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा दुसऱ्यांदा विजय झाला आहे. किरण सरनाईक यांनी काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव केला आहे. पसंती क्रमांक दोनच्या मतमोजणी मध्ये किरण सरनाईक यांचा विजय झाला. मागील 2020 च्या निवडणुकीमध्ये किरण सरनाईक यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता. या निवडणुकीमध्ये किरण सरनाईक यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करत महायुतीची उमेदवारी मिळवली होती.
किरण सरनाईक याआधी काँग्रेसमध्ये होते. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढवली आणि जिंकली देखील होती. किरण सरनाईक हे वाशिम जिल्ह्यातील शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली होती. मात्र यानंतर त्यांचा पुन्हा एकदा पक्षप्रवेश झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
किरण सरनाईक यांच्या आई स्व.मालताबाई सरनाईक या विधानपरिषदेच्या काँग्रेसच्या आमदार होत्या. किरणराव सरनाईक हे वाशिम जिल्ह्यातील शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. ही संस्था त्यांचे वडील दिवंगत अप्पासाहेब सरनाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्थापन केली होती. सरनाईक हे काही काळ अकोला जिल्ह्यात युवक काँग्रेसचे माजी अध्यक्षही होते. त्यांचे वडीलही विदर्भ काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी होते. विशेष म्हणजे मागील 50 वर्षांपासून सरनाईक घराणं हे काँग्रेस पक्षाच्या सोबत होते.
अमरावतीमध्ये उमेदवार कोण होते?
किरण सरनाईक यांच्यासमोर काँग्रेसच्या अदिती पोहरे, शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार दत्तात्रय लहाने, भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे आणि याशिवाय शिक्षक संघटनांचे आणि अपक्ष उमेदवार यांचं आव्हान होतं.
मतदार आणि उमेदवार
अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ हे जिल्हे यात समाविष्ट आहेत. पाच जिल्ह्यांमध्ये 35 हजार 810 मतदार आहेत.