'पवार साहेबांनी डिलिमिटेशनला पाठिंबा दिला नाही तर त्यांची जाहिर ही माफी मागेन. पवार साहेबांच्या पायावर डोकं ठेवून ही लोकशाही वाचवण्यासाठी त्यांची माफी मागेन,' असं वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्याची भूमिका जाहीर करताच काँग्रेसने उघडपणे शरद पवारांवर टीका केली होती. विजय वडेट्टीवार यांनीही संतप्त होत, शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचा, अशी जहरी टीका केली होती.
विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेमुळं राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर देत टीका केली होती. यावर आता विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांना दुखावण्याचा प्रश्नच नाही, असं म्हटलं आहे. नागपुरात माध्यमांसमोर बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
'शरद पवारांना दुखावण्याचा प्रश्नच नाही. आमचा त्यांना दुखवण्याचा हेतू नव्हता, जनतेची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीपक्षाकडून भूमिका स्पष्ट झाल्यानंतर ती मांडण्याचा प्रयत्न केला. जर पवार साहेबांनी डिलिमिटेशनला पाठिंबा दिला नाही तर त्यांची जाहिरही माफी मागेन. पवार साहेबांच्या पायावर डोकं ठेवून ही लोकशाही वाचवण्यासाठी त्यांची माफी मागेन,' असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
'पवारांना आमची हात जोडून विनंती राहणार आहे. आम्ही माफी मागू. शरद पवारांनी या बिलाला पाठिंबा देऊ नये, अशी आमची विनंती असणार आहे. पवार साहेबांना भेटून या सगळ्या विधेयकाची माहिती त्यांना देणार,' असंही त्यांनी म्हटलं आहे.
'शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला, तर त्यामध्ये त्यांचे नाव इतिहासात नोंदवले जाईल. अन्यथा उद्या स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून नव्हे, तर गुलाम म्हणून आपल्याला सामोरे जावे लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे,' अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
'मला विश्वास आहे की आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीनंतर, आम्हाला माहिती नाही भेटीगाठी आहे की नाही, तुमच्या माध्यमातून ऐकतोय. या भेटीगाठीतून चांगला मार्ग निघावा. देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल करताना दिसतो. ते थांबावं लोकशाही या देशात दिर्घकाळ नांदावी. सत्ता एका ठिकाणी स्थिर राहू नये, सत्ता बदलत राहिली पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका आहे,' असंही त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसचे खासदार आमच्यासोबत आहेत. काँग्रेसचे खासदार डिलिमिटेशनच्या बाजूने असते, तर हे बिल केव्हाच पास झाले असते. काँग्रेसमधून कुठलाही खासदार फुटणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे, असं म्हणत त्यांनी चर्चा फेटाळून लावल्या आहेत.