कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारपी पार पडली. या निवडणुकीमध्ये महायुतीने बाजी मारली असून हा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढून 13 सदस्य निवडून आणलेल्या 'समविचारी आघाडी'साठी मोठा धक्का मानला जात आहे. असं असतानाच आता या निवडणुकीतील मतपत्रिकांसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
निवडणुकीसंदर्भातील गोंधळ
समाविचारी आघाडी आणि महायुतीदरम्यान रंगलेल्या गोकुळच्या निवडणुकीमध्ये 25 सदस्यांपैकी 13 सदस्य निवडून आणत समविचारी आघाडीने बहुमत मिळवलं. मात्र अध्यक्ष नियुक्तीसाठी 14 जणांची उपस्थिती आवश्यक असल्याने कोरम पूर्ण न झाल्या कारणाने समविचार आघाडीला अध्यक्ष निवडता आला नाही. या निवडीच्या वेळी महायुतीचे सर्व सदस्य अनुपस्थित होते. हा तिढा सोडवण्यासाठी राज्य शासनाने शासन आदेश काढून चार सदस्यांची नियुक्ती संचालक मंडळावर केली. त्या चार सदस्यांना मतदानाचा अधिकारी देण्यात आल्याने निवडणूक फिरली आणि महायुतीचे उमेदवार आणि चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांचा 16 विरुद्ध 13 मतांनी विजय झाला. महायुतीच्या 12 सदस्यांसोबत उर्वरित चार शासन नियुक्त सदस्यांनीही महायुतीच्या पारड्यात मतं टाकली.
कुठे आहेत मतपत्रिका?
मात्र या निकालाच्या आदल्या दिवशीच न्यायालयीन सुनावणीदरम्यान निवडणूक ठरलेल्या दिवशी घेण्याचे आदेश कोर्टाने दिलेले. मात्र आता या मतपत्रिकांच्या आधारे अध्यक्ष निवडण्यात आला आहे त्या मतपत्रिकांसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गोकूळच्या अध्यक्ष निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मतपत्रिका सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. अध्यक्ष निवडीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अध्यक्ष निवडणुकीसाठी वापरलेल्या मतपत्रिका, नामनिर्देशनपत्रे, अध्यक्ष निवडीच्या अनुषंगीक कागदपत्रे सिलबंद पेटीमध्ये कोल्हापूर जिल्हा कोषागार कार्यालय येथे सुरक्षित ठेवल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट ब्रांचमध्ये अध्यक्ष निवडीसंदर्भात समविचारी पॅनलने दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात सुनावणी सुरू आहे. त्या अनुषंगाने अध्यक्ष निवडीसाठी वापरलेल्या मतपत्रिका सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
निवडणूक प्रक्रिया न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन
मंगळवारच्या मतदानाआधी सोमवारी झालेल्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीला स्थगिती न देता मतदान घेण्यास परवानगी दिली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता बुधवारी 25 नोव्हेंबर 2026 रोजी होणार असून, ही निवडणूक प्रक्रिया न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहणार आहे. याच अनुषंगाने निवडणुकीसंदर्भातील मतदानपत्रिकांसोबतच सर्व कागदपत्रं सुरक्षित ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.