कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजेच गोकुळच्या निवडणुकीचा मुद्दा राज्यभरामध्ये चर्चेत असतानाच मागील आठवड्यापासून अधिक काळ हा मुद्दा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. असं असतानाच आत गोकुळच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. मात्र शासनाने या प्रकरणामध्ये चार सदस्यांची संचालक मंडळावर नियुक्ती केल्याने अध्यक्ष काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचार आघाडीचा बसणार की मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोर लावलेल्या महायुतीच्या गटाचा हे आज स्पष्ट होणार आहे. मात्र गोकुळसंदर्भातील या वादादरम्यान गुजरातमधील 'अमूल' दूध महासंघाचाही अनेकदा उल्लेख झाल्याचं पाहायला मिळालं. पण मतदानाच्या दोन दिवस आधीच मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेट देण्यात आलेल्या एका गिफ्टवरुन काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. या भेटीला 'अमूल'चा संदर्भ आहे.
कोणी आणि काय पोस्ट केलंय?
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष असल्याचं आपल्या प्रोफाइलवर नमूद केलेल्या ऋषिकेश पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना मिळालेल्या एका भेटीसंदर्भातील पोस्ट केली आहे. ऋषिकेश पाटील यांनी पोस्ट केलेला फोटो शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडेंनी चंद्रकात पाटलांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली तेव्हाचा आहे. या फोटोमध्ये गावडे चंद्रकांत पाटलांना जी गोष्ट भेट देत आहेत त्यावरुनच काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्याने आक्षेप घेतला आहे.
कशामुळे हे भाजपने सुरू केले आहे? याच्यामागे काय कारण आहे?
"हे आता जाणीवपूर्वक सुरू आहे का? शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांनी आज (8 नोव्हेंबर रोजी) मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, अशी पोस्ट केली आहे. या भेटीत मुद्दाम अमूल डेअरी प्रोडक्ट दिसेल अशा पद्धतीने फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. भाजप नेत्यांनी आता 'अमूल' प्रॉडक्ट भेट देण्याचा मुद्दाम प्रयत्न सुरू केला आहे. कशामुळे हे भाजपने सुरू केले आहे? याच्यामागे काय कारण आहे? लोकांनी 'अमूल'कडे वळावे हा केविलवाणा प्रयत्न भाजप नेते करत आहेत का ? 'गोकुळ'च्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व सुरू आहे का?" असा सवाल ऋषिकेश पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये विचारला आहे.

सतेज पाटलांकडूनही 'अमूल'चा उल्लेख
गोकुळसंदर्भातील गोंधळादरम्यान सतेज पाटलांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्येही 'अमूल'चा उल्लेख केला होता. मी गोकुळचे गुलाबजाम आणणार होतो. कारण कधी यावर 'अमूल'चे स्टीकर लागेल सांगता येत नाही, अशी टीका सतेज पाटलांनी केलेली. राज्य सरकारने गोकुळ दूध संघात पाच स्वीकृत संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेत चौघांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर सतेज पाटलांनी, "कोल्हापूरची सहकार परंपरा मोडीत काढून, मागच्या दाराने सत्ता बळकावत गोकुळचा ताबा 'अमूल'कडे सोपवण्याचा हा आटापिटा सुरू आहे," असा आरोप केला होता. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करताना सतेज पाटलांनी, "भविष्यात संपूर्ण देशात केवळ 'अमूल' आणि 'मदर डेअरी' हे दोनच मोठे दूध ब्रँड शिल्लक ठेवण्याचे सरकारचे मोठे षडयंत्र आहे," असंही म्हटलं होतं.
सतेज पाटलांनी 'महानंद'चा संदर्भ देत 'अमूल'चा उल्लेख करत टीका केलेली. "महाराष्ट्रातील 'महानंदा' दूध संघाची दुरवस्था करून त्याचे व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेकडे देण्यात आले. याच धर्तीवर गोकुळच्या उत्पादनांवरही भविष्यात 'अमूल'चे स्टिकर लावले जाईल आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकीची संस्था गुजरातच्या मिल्क फेडरेशनच्या घशात घातली जाईल," असंही सतेज पाटील म्हणाले.