राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी घडत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या (शरद पवार गट आणि अजित पवार गट) विलीनीकरणाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. विलीनीकरणाबाबत वेगवान हालचाली सुरू असतानाच एक मोठी घडामोड समोर येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन केले जात असल्याची माहिती समोर येतेय.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन सुरु असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपासून सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून फोन सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीचे 22 आमदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
सध्याच्या पक्षाबाबत माध्यमांत सुरू असलेल्या घडामोडींवर आपलं मत काय? विलीनीकरण करणे योग्य वाटत आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खरच संपर्क करण्यात आला का याबाबत विचारणा झाल्याची आमदारांची नाव न सांगण्याचा अटीवर माहिती दिली असल्याचे समोर येतेय.
पुण्यात पार्थ पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाचे पदाधिकारी आणि ठराविक आमदारांची बैठक होत आहे. जिजाई निवासस्थानी पार्थ पवारांनी तातडीने बैठक बोलावली आहे. त्यानुसार आता
सात आमदार जिजाई निवासस्थानी असल्याची माहिती असून नुकतेच भोरचे आमदार शंकर मांडेकर बैठकीसाठी पोहचले आहेत. पार्थ पवारांनी बोलवलेल्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मनात काय? याबाबत पार्थ पवार आमदारांची मतं जाणून घेणार आहेत.
विलिनीकरणाची चर्चा असताना दोन्ही राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आज दिल्लीत आहे. सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे दिल्लीत आहे. सुप्रिया सुळे संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीला हजेरी लावणार आहे. तर तटकरे, पटेल हे स्टँडिंग कमिटीच्या बैठकीसाठी दिल्लीत आहेत. तटकरे पेट्रोलियम नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत. बैठकांसाठी हे तिन्ही नेते दिल्लीत आहेत. मात्र विलिनीकरणाच्या अनुषंगाने दिल्लीत गाठीभेटी होणार का हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.