पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं थेट सुनेत्रा पवारांना लक्ष्य केलं आहे. आधी पुण्याचं पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घ्यावं असं म्हणत सुप्रिया सुळेंनी त्यांची भूमिका विशद केली होती. मात्र आता पुण्याच्या पालकमंत्री या अजितदादांसारखं काम करत नसल्याचं म्हणत रोहित पवारांनी थेट सुनेत्रा पवारांच्या कारभारावरच सवाल उपस्थित केले आहेत. पुण्याला एक कणखर पालकमंत्री देण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर झालेल्या रक्तरंजित थरारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, "सुनेत्रा वहिनींना दादांसारखे काम करता येत नाही. दादांची एक वचक होती, प्रशासनावर दबाव आणि दरार होता. दादा गेल्यानंतर त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. मुख्यमंत्री यांनी पुण्याचे पालकमंत्रीपद घेतले तर पुण्याचे वाटोळे होईल. पुण्याला जरा कडक पालकमंत्री द्या. दादांची जागा कुणी घेऊ शकत नाही पण जरा कडक पालकमंत्री द्या किंवा सुनेत्रा काकींना ताकद द्या".
"मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिलं आहे. हा राजकीय विषय नसून, जरी ते गृहमंत्री असले तरी मला टीका करायची नाही. मला हा विषय फार गांभीर्याने घ्यायचा आहे. देशातील वेगाने विकसित होणारं शहर म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं. अनेक मोठ्या शैक्षणिक संस्था पुण्यात आहेत. मोठी उलाढाल, व्यवसाय पुण्यात होत असताना गुन्हेगारी इतकी वाढणं हे पुणे शहर नाही, राज्य नाही तर देशाच्या हिताचं नाही," अशी भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे.
"पुण्यातील राजीव गांधी इंफोटेक पार्क येते 6 लाख काम करतात. त्या पुण्यात घडलेली घटना चिंताजनक आहे. लोकप्रतिनिधी, महिला आणि पुण्याची नागरिक म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, आपण पुण्याची जबाबदारी स्वत: घ्यावी, पालकत्व घ्यावं. कारण पुण्याला हे न शोभणारं, झेपणारं आहे".
रोहित पवारांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की, "मी बारामतीकर आहे पुणे जिल्ह्याचा नागरिक आहे. एक पुणेकर नागरिक असून अजित पवारांनाच पालकमंत्री म्हणून पाहिलं आहे. त्यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांचा विषय आला की आम्ही भावूक होतो. पुणे शहर ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना पाहिलं आहे. जर माझ्या विधानाने सुनेत्रा पवार दुखावल्या असतील तर व्यक्तिगत माफी मागतो. भाजप सोबत अजित पवारांचा पक्ष गेला तेव्हापासून पुणे सीपी केवळ भाजपच ऐकतात. मी म्हणालो सुनेत्रा पवारांना ताकद द्या. मुख्यमंत्री यांचा आदर आहे. मात्र गुन्हेगारीचा विषय मोठा आहे. बलात्कार विनयभंग कोयत्याने मारामारी होत आहेत. अशा घटना घडत आहे त्यामुळे मी भावनिक होऊन बोललो".
"अजितदादा असताना पुण्यावर त्यांचा वचक होता. आता पुणे सीपी सुनेत्रा पवारांच ऐकतात का हा प्रश्न आहे? आम्ही राजकारण करत नाही जे सत्य आहे ते मांडत आहे. पवारांच्या घरातला व्यक्ती म्हणून बोलतोय. काही अधिकारी फक्त भाजपच्या लोकांच ऐकतात बाकी कुणाचं ते ऐकत नाही. साताऱ्याला देखील एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना तिथल्या एसपीने बाहेर ढकललं होतं हा इतिहास आहे," याची आठवण त्यांनी करुन दिली.