सोशल मीडियावर पोलिसाचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओसंदर्भात माहिती समोर आली आहे. हा व्हिडीओ नवी मुंबईतील कळंबोली परिसरातील नाकावरील आहे. या ठिकाणी कायम नियमित पोलिसांकडून नाकाबंदी केली जाते आणि वाहनांची तपासणी करण्यात येते.
रात्रीच्या वेळी वाहनाची तपासणी सुरु असताना अचानक तिथे एक स्विफ्ट डिझायर आली. पोलिसांनी त्या कारला थांबण्याचा इशारा केला. पण ती थांबण्यासाठी तयार नव्हती. कारसमोर पोलीस उभे होते. तरीदेखील कारचालकाने पोलीस कॉन्स्टेबलच्या अंगावर कार घातली. अशास्थितीत कार थांबवण्यासाठी तो पोलीस कॉन्स्टेबल कारच्या बोनेटवर चढला. धक्कादायक म्हणजे या कारचालकाची मुजोरी त्याने बोनेटवर पोलीस कॉन्स्टेबल असतानाही कार जवळपास 200 मीटर नेली. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत पुढे जाऊन तो पोलीस कॉन्स्टेबल खाली पडला. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
ही सर्व धक्कादायक घटना तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्या जखमी कॉन्स्टेबलचं नाव दिलीप भोई असून ते कायम कळंबोली परिसरातील या भागात वाहन तपासणीच्या ड्युटीवर असतात. दरम्यान या कारमध्ये दोन संशयित व्यक्ती असून ते सध्या फरार आहेत. त्यांच्या पोलिसांकडून शोध सुरू आहे.
धक्कादायक म्हणजे या कारची माहिती काढताना महत्त्वाचा खुलासा झाला आहे. या कारची नंबर प्लेट ही बनावट असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे या दोन व्यक्तींबद्दलचा संशय अधिकच बळावला आहे. त्यामुळे या कारला बनावट नंबर प्लेट का होती, ते नाकाबंदीत कार थांबवण्यास सांगितल्यावर का पळाले. नेमकं काय गुन्हा केला आहे, की तो कोणते गुन्हेगार होते, अशा अनेक प्रश्नांचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.