मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयकावरुन 'इंडिया' आघाडीमधील दोन महत्त्वाच्या घटकपक्षांनी सरकारच्या बाजूने भूमिका घेतल्याने काँग्रेस अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. दक्षिणेतील द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच द्रमुक आणि महाराष्ट्रातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतल्याने आज काँग्रेसचे महत्त्वाचे नेते चेन्नई आणि मुंबईचा तातडीचा दौरा करणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आज चेन्नई आणि मुंबई दौरा करणार आहेत. या दोन प्रमुख नेत्यांसोबत राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, काँग्रेस शासित राज्याचे मुख्यमंत्री डी. के शिवकुमार, रेवंत रेड्डीही असणार आहेत.
आधी चेन्नई दौरा
चेन्नईमध्ये काँग्रेसचे दोन्ही प्रमुख नेते द्रमुकचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत. केंद्र सरकारच्या प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षण विधेयकाला द्रमुकने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष असूनही द्रमुकने तामिळनाडूच्या हिताच्या काही अटी मान्य झाल्यानंतर या विधेयकाला समर्थन देत असल्याचं म्हटलं आहे. राज्यातील जागाही 50 टक्क्यांनी वाढवण्याची द्रमुकची मागणी होती. ही मान्य झाल्याने पक्षाने सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. पण आता स्टॅलिन यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून केला जाणार आहे. दुपारी 2 वाजता काँग्रसचे हे दोन्ही ज्येष्ठ नेते चेन्नईमध्ये दाखल होणार असून ते दुपारी 2 ते 5 दरम्यान स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत.
रात्री शरद पवारांची भेट घेणार
दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही सरकार समर्थनार्थ भूमिका घेतली असल्याने सरकारची ताकद अधिक वाढली आहे. काँग्रेसचा जुना मित्र पक्ष असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 8 खासदार आहेत. त्यामुळे या खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान करावं असं काँग्रेसचं मत असून याचसंदर्भातील चर्चेसाठी खर्गे आणि सोनिया गांधी शरद पवारांना भेटणार आहेत. शरद पवार हे सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. इथेच सोनिया गांधी आणि खर्गे त्यांची भेट घेणार आहेत. चेन्नई दौऱ्यानंतर दोन्ही नेते रात्री आठच्या सुमारास मुंबईत दाखल होतील असं सांगितलं जात आहे.
पवारांबद्दल काँग्रेसची सामंजस्याची भूमिका, राहुल म्हणाले...
दरम्यान, दुसरीकडे शनिवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी शरद पवारांसंदर्भात मोठं विधान केलं. "शरद पवारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलं तरी त्यांचं इंडिया आघाडीमधील स्थान कायम राहणार आहे. या विधेयकासंदर्भातील मतदानावरुन पवारांचं इंडिया आघाडीतील स्थान बदलणार नाही," असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने शरद पवारांसंदर्भात सामंजस्याची भूमिका घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.