"संसदेचे हिवाळी अधिवेशन टाळून सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याचे ठरवले आहे. संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी समाज माध्यमांतून विशेष अधिवेशनाची घोषणा करावी हे दुर्दैवी आहे. त्याआधी विरोधी पक्षनेते, संसदेचे इतर प्रमुख नेते यांच्याशी चर्चा करण्याचे सौजन्य सरकारने दाखवले नाही. रिजिजू समाज माध्यमांवर सूचना देतात की, ‘‘सरकारने लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना 30 नोव्हेंबर रोजी, तर राज्यसभा चेअरमन यांना 2 डिसेंबर रोजी अधिवेशन बोलावण्याबाबत विनंती केली आहे.’’ हे सरकार निर्णय घेते, डाव मांडते व मग लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापतींना कळवते. ‘विनंती’ वगैरे शब्द त्यांच्या शब्दकोशात नाहीत. हे विशेष अधिवेशन आहे व मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी हा दुसरा डाव मांडला आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
आकडा कोणत्या मार्गाने गोळा केला?
"2026 चे पावसाळी सत्र अनियमित काळासाठी स्थगित करून शंभर दिवस पूर्ण झाले, पण संसदेचे सत्रावसान न केल्याने ते अल्प सूचनेवर कधीही बोलवू शकण्याचा अधिकार सरकारने हाताशी ठेवला होता. त्यामुळे हे तेव्हाच नक्की झाले होते की, डिलिमिटेशन विधेयक पराभूत झाले व त्याचा वचपा काढण्यासाठी सरकार आकडेबाजी पूर्ण करून विशेष अधिवेशन त्यांना हवे तेव्हा बोलवेल. विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला दोन तृतीयांश इतक्या बहुमताची गरज आहे. हा आकडा सरकारला जमवता आला नाही. त्यामुळे 17 एप्रिल 2026 ला हे विधेयक लोकसभेत कोसळले. आता सरकार हे विधेयक पुन्हा घेऊन येत असेल तर ‘वरचा’ आकडा त्यांनी कोणत्या मार्गाने गोळा केला?" असा सवाल 'सामना'मधून करण्यात आला आहे.
भारतीय लोकशाहीला कमजोर करण्याची प्रक्रिया...
"तामीळनाडूतील द्रमुक व महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे पक्ष विधेयकाच्या बाजूने मतदान करतील असे सांगितले जाते. तसे झाले तर या दोन्ही पक्षांनी आतापर्यंत जपलेल्या विचारधारेशी प्रतारणा ठरेल. द्रमुक आणि काँग्रेस पक्षात सध्या वितुष्ट आहे. द्रमुकने काँग्रेसशी नाते तोडून इंडिया आघाडीशी फारकत घेतली आहे. तरीही त्यांचे नेते वारंवार ‘भाजपला मदत न करण्याची’ भूमिका मांडत आहेत. भाजपसारख्या धर्मांध शक्तीबरोबर हातमिळवणी करणे म्हणजे द्रमुकने जनाधार गमावण्यासारखे आहे. द्रमुकचे 28 खासदार आहेत व हा आकडा मोठा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आकडय़ास आजच्या परिस्थितीत महत्त्व आहे. विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर पक्ष फोडला जाईल अशी भीती अनेकांना घातली जात आहे व त्यामुळे अनेकांचे पाय लटपटू लागले आहेत. हे लटपटणारे पाय म्हणजे भारतीय लोकशाहीला कमजोर करण्याची प्रक्रिया आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
हे ‘डोके’ राष्ट्रकल्याणासाठी वापरले असते तर...
"लोकसभेत 850 खासदारांची संख्या करायची व त्यासाठी मतदारसंघांची पुनर्रचना म्हणजे मर्जीप्रमाणे तोडमोड करायची असा हा सर्व खेळ आहे. मोदी-शहांना देशाची चिंता नसून 2029 च्या जय-पराजयाची चिंता लागून राहिली आहे. देशासमोर आर्थिक, सामाजिक, अंतर्गत सुरक्षा, सीमेवरील तणाव असे अनेक प्रश्न तांडव करीत आहेत. महागाईने कहर केला आहे. महाराष्ट्रासारखे राज्य दुष्काळात होरपळत आहे. त्यावर एक विशेष अधिवेशन बोलावून चर्चा घडवावी असे पंतप्रधान मोदी आणि शहांना वाटले नाही, पण 850 खासदारांच्या विधेयकासाठी त्यांचे प्राण कंठाशी आलेत व विधेयकाच्या मंजुरीसाठी त्यांनी सापळे रचून खासदार जमवलेत. हे ‘डोके’ राष्ट्रकल्याणासाठी वापरले असते तर देशातील वातावरण निर्मळ झाले असते. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करणे ही सरकारने प्राथमिकता मानली. राज्याराज्यांतील लोकसंख्येनुसार जागांचे प्रमाण वाढेल. त्यामुळे उत्तरेत लोकसंख्येचा स्फोट असल्याने प्रचंड जागा वाढतील व दक्षिणेतील राज्यांनी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवल्याने त्यांच्या जागा वाढणार नाहीत. दक्षिणेतील राज्यांचा विधेयकास विरोध आहे. त्यात केरळ व तामीळनाडूचे पक्ष सहभागी आहेत. आंध्रातील चंद्राबाबू नायडूंचा तेलगू देसम मोदी-शहांच्या सरकारमध्ये सहभागी आहे, पण वाय.एस.आर. काँग्रेसच्या जगन यांनी विधेयकाच्या विरोधात आज तरी सूर लावला. तो प्रत्यक्ष संसदेतील मतदानापर्यंत टिकेल काय? जगन यांच्यावर ईडी, सीबीआयची प्रकरणे सुरू आहेत व अटकेची टांगती तलवार ठेवून त्यांच्या पक्षाची चार-पाच मते वळवली जातील," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलंय.
मोदी व शहांनी हे बिल मंजूर करून घेतले तर...
"चंद्रशेखर आझाद, एम.आय.एम. यांची तिसरी आघाडी नेहमीच भाजपची ‘मन की बात’ मानून काम करत असते. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. या बिलास पाठिंबा देण्याची अवदसा ज्यांना आठवेल त्यांनी देशहिताचा विचार केलेला नसेल. डिलिमिटेशन विधेयक हे देशावर उत्तरेचे म्हणजे ‘काऊ बेल्ट’चे वर्चस्व लादून ते सदैव टिकवणारे आहे. म्हणजे दिल्लीवर ताबा उत्तरेचाच राहील. कधी अयोध्येचे, कधी मथुरेचे, कधी एखाद्या मशिदीचे राजकारण करून दंगली घडवल्या जातील आणि त्यावर निवडणुका लढवून सत्तेपर्यंत पोहोचण्याची शिडी निर्माण केली जाईल. डिलिमिटेशन बिलाचा तोच मुख्य उद्देश आहे. या बिलामुळे महाराष्ट्राचा व दक्षिणेचा पंतप्रधान कधीच होणार नाही. मोदी व शहांनी हे बिल मंजूर करून घेतले तर ‘लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेचा लगाम हाती ठेवला’ अशीच नोंद इतिहासात होईल. हे सत्य स्वीकारण्याची हिंमत आज कोणात आहे? देशापुढील संकटांचे आव्हान वाढत आहे," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.