सर्वोच्च न्यायालयाचा दुसरं लग्न करणाऱ्या पतीला दणका, परदेशात घटस्फोट मिळाला म्हणजे भारतातील लग्न संपत नाही; दिला महत्वाचा आदेश
Divorce News : भारतात हिंदू विवाह कायद्यानुसार झालेल्या लग्नासाठी परदेशी न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा आदेश भारतीय कायद्यानुसार वैध ठरणे आवश्यक आहे. परदेशातील न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला म्हणून भारतात झालेले लग्न आपोआप संपुष्टात येत नाही असा महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Divorce News : सर्वोच्च न्यायालयाने परदेशातील घटस्फोटाविषयी एक महत्वाचा निर्णय दिला आहे. एका खटल्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की परदेशातील न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला म्हणून भारतात झालेले लग्न आपोआप संपुष्टात येत नाही. भारतात हिंदू विवाह कायद्यानुसार झालेल्या लग्नासाठी परदेशी न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा आदेश भारतीय कायद्यानुसार वैध ठरणे आवश्यक आहे. विशेषतः विवाहाचे नाते पूर्णपणे संपुष्टात आल्याच्या कारणावरून परदेशात मिळालेला घटस्फोट भारतात आपोआप मान्य होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
कोणी दिला निर्णय?
न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने मंगळवारी हा निर्णय दिला. पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्याच्या आरोपावरून सुरू असलेली फौजदारी कारवाई रद्द करण्याची मागणी करणाऱ्या पतीची याचिका न्यायालयाने फेटाळली.
हेही वाचा : विराट कोहलीने पकडली फॅन्सची हुशारी, ऑटोग्राफ देण्यास दिला नकार, नेमकं काय झालं? Video व्हायरल
परदेशातील घटस्फोटाचा आदेश भारतात कधी मान्य होतो?
परदेशातील न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा आदेश भारतात मान्य होण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम 13 मधील सर्व अटी पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. परदेशी न्यायालयाचा निर्णय भारतीय कायद्याशी विसंगत असल्यास किंवा येथील कायद्यात मान्यता नसलेल्या कारणावर आधारित असल्यास तो भारतात अमलात आणता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले आहे.या प्रकरणातील संबंधित व्यक्तीचे पहिले लग्न 18 एप्रिल 2003 रोजी आंध्र प्रदेशातील सत्तेनपल्ली येथे हिंदू रीतिरिवाजांनुसार झाले होते. त्यानंतर हे दाम्पत्य हैदराबादमध्ये राहत होते. पती उस्मानिया मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होता. 4 फेब्रुवारी 2005 रोजी तो वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ब्रिटनला गेला. त्यानंतर पत्नीही त्याच्याकडे गेली. ऑगस्ट 2007 मध्ये बाळंतपणासाठी ती आंध्र प्रदेशातील माहेरी परतली. मात्र, वारंवार विनंती करूनही पत्नी ब्रिटनला परतली नाही, असा दावा पतीने केला.
दोघांमधील वैवाहिक संबंध बिघडल्यानंतर पतीने गुंटूर जिल्ह्यातील नरसारावपेट येथील न्यायालयात घटस्फोट आणि मुलाच्या ताब्यासाठी याचिका दाखल केली. मात्र या याचिका फेटाळण्यात आल्या. त्यानंतर त्याने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात अपील केले, पण नंतर ते मागे घेतले गेले.