सध्या महागाई खूप वाढलीय. त्यामुळे एखाद्याला 50 हजार ते लाखभर पगार असेल तरी तो त्यांना कमी वाटतो. सेव्हिंग कशी करायची? खर्च कुठे करायचा? असे प्रश्न नोकरदार वर्गाला पडतो. पण अवघा 18 हजार पगार घेणारा सिक्योरुटी गार्ड घर कसं चालवतो? हे ऐकून तुमचीही पगाराकडे पाहण्याची नजर बदलेल. हे आपल्यालाही शक्य आहे, असं तुम्ही म्हणालं.
महिन्याला 18 हजार रुपये पगार मिळत असेल तर घरखर्च भागवून किती पैसे शिल्लक राहतील? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अंकित पांडे नावाच्या एक्स युजरने एका सिक्युरिटी गार्डशी झालेल्या संवादानंतर त्याच्या महिन्याच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा तपशील शेअर केला. ही पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होतेय. यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळाल्याची भावना लोकं व्यक्त करतायत.
संबंधित सुरक्षा रक्षकाला दरमहा 18 हजार रुपये पगार मिळतो. मात्र घरभाडे, किराणा, मुलांचे शिक्षण आणि औषधांचा खर्च भागवल्यानंतर त्याच्या हातात केवळ दोन हजार रुपये उरतात, असे या पोस्टमध्ये म्हटलंय. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कमी उत्पन्नात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा सुरू झालीय.
या सुरक्षा रक्षकाच्या महिन्याच्या खर्चात सर्वाधिक रक्कम अन्नधान्य आणि जेवणासाठी जाते. त्यासाठी दरमहा सहा हजार रुपये खर्च होतात. घरभाड्यासाठी चार हजार रुपये द्यावे लागतात. म्हणजेच या दोन गरजांवरच त्याच्या पगारातील दहा हजार रुपये खर्च होतात. याशिवाय मुलांच्या शाळेच्या फीपोटी दोन हजार रुपये खर्च होतात. मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह या दोन्ही गोष्टी सांभाळताना पगाराचा मोठा भाग संपतो, हे या हिशेबातून दिसते.
घरभाडे आणि किराण्याव्यतिरिक्त प्रवासासाठी दरमहा दोन हजार रुपये खर्च होतात. घरातील वीजबिल आणि इतर बिलांसाठी एक हजार रुपये, तर औषधांसाठी आणखी एक हजार रुपये खर्च होतात. अशा प्रकारे त्याचा एकूण मासिक खर्च 16 हजार रुपये होतो. 18 हजार रुपयांच्या पगारातून हे सर्व खर्च वजा केल्यानंतर केवळ दोन हजार रुपये शिल्लक राहतात. म्हणजेच महिन्याच्या कमाईपैकी जवळपास 89 टक्के रक्कम मूलभूत गरजांवर खर्च होते.
या पोस्टवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतायत. काहींनी कमी पगारातही दोन हजार रुपये वाचवणाऱ्या सुरक्षा रक्षकाचे कौतुक केलंय. तर काहींनी ही बचत प्रत्यक्षात किती टिकेल?, असा प्रश्न उपस्थित केला. घरात अचानक आजारपण आले, मुलांच्या शिक्षणासाठी अतिरिक्त खर्च झाला किंवा एखादी वस्तू खराब झाली, तर ही दोन हजार रुपयांची बचत सहज संपुन जाईल. त्यामुळे केवळ महिन्याच्या अखेरीस पैसे शिल्लक राहणे म्हणजे आर्थिक सुरक्षितता नव्हे, अशी चर्चा नेटकरी करताना दिसतायत.
या पोस्टमुळे सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर आणि खासगी शाळांमधील कर्मचाऱ्यांसारख्या कमी वेतनावर काम करणाऱ्या वर्गाच्या आर्थिक अडचणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. मुंबई, पुणे आणि ठाण्यासारख्या शहरांमध्ये घरभाडे, प्रवास आणि शिक्षणाचा खर्च लक्षात घेता कमी उत्पन्नात बचत करणे आणखी कठीण ठरू शकते, हे यातून दिसतंय.