भारताच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये पुढील 12 दिवसांमध्ये म्हणजेच 1 डिसेंबरपर्यंत काहीतरी मोठं घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या चर्चेमागील कारण ठरत आहे एक पत्र! हे पत्र नक्की कोणी कोणाला पाठवलं आहे? या पत्रात आहे काय? जाणून घेऊयात...
काय आहे पत्रामध्ये?
सदर पत्र काँग्रेसच्या खासदारांना पाठवण्यात आलं असून पक्षाच्या सर्वच खासदारांना पुढील 12 दिवस प्रवासाचे नियोजन फ्लेक्सिबल ठेवण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या संघटनात्मक आणि संसदीय घडामोडींची शक्यता लक्षात घेता या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शॉर्ट नोटीसवर दिल्लीत उपस्थित राहण्याची तयारी ठेवा, असं खासदारांना सांगण्यात आलं आहे. पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ही तयारी केल्याची सूत्रांची माहिती आहे.
कोणी पाठवलं आहे हे पत्र?
लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी खासदारांना हे पत्र पाठवलं आहे. खासदारांनी त्यांचे वैयक्तिक कार्यक्रम किंवा मतदारसंघातील दौरे पूर्णपणे रद्द करावे असा थेट उल्लेक पत्रात नाही, मात्र गरज पडल्यास त्यात बदल करता यावा यासाठी वेळापत्रक फ्लेक्सिबल ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.
नेमकं काय होऊ शकतं?
इंग्रजी वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेचे पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्ट 2026 रोजी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले होते. परंतु ते अद्याप औपचारिकरीत्या स्थगित करण्यात आलेले नाही. यामुळे सरकार नवीन समन्स न काढता अगदी शॉर्ट नोटीसवर संसदेचे कामकाज पुन्हा सुरू करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असं झालं तर पक्षाच्या खासदारांना या कामकाजामध्ये सहभागी होता आलं पाहिजे असा पक्षाचा मानस आहे.
सरकारचा प्रयत्न काय?
दुसरीकडे सरकारकडून आगामी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलीमीटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक मांडली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आगामी संसदीय रणनीती आणि पक्षीय बैठकांसाठी खासदारांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
संसदेत कोणाचे किती खासदार?
सध्या संसदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे 241 खासदार आहेत. त्या खालोखाल काँग्रेसचे सर्वाधिक खासदार असून काँग्रेस खासदारांची संख्या 98 इतकी आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचे 37 खासदार असून तृणमूल काँग्रेसचे 28 खासदार आहेत. डीएमके म्हणजेच द्रविड मुन्नेत्र कळघमचे 22 खासदार संसदेत आहेत. टीडीपी म्हणजेच तेलगू देसम पार्टीचे 16 खासदार 2024 मध्ये निवडून आले आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेचे एकूण 13 खासदार असून नितेश कुमार यांच्या जनता दल युनायटेड अर्थात जेडीयूचे 12 खासदार आहेत. शरद पवारांच्या पक्षाचे 8, रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे 5, ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक खासदार संसदेत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे चार, व्हायएसआर काँग्रेसचे चार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे 4, आम आदमी पार्टीचे 3, झारखंड मुक्ती मोर्चाचे 3 खासदार संसदेत आहेत.