अपघातानंतर कारला लागलेल्या आगीत सहा जणांचा जिवंत होरपळून मृत्यू झाला आहे. फ्लायओव्हरवरून जाणाऱ्या भरधाव कारने डिव्हायडरला धडक दिली आणि त्यानंतर ती थेट विजेच्या खांबावर जाऊन आदळली. या धडकेनंतर गाडीला आग लागली, ज्यामध्ये गाडीतील सहाही जण जिवंत जळून ठार झाले. प्राथमिक माहितीनुसार, हे सर्वजण हरियाणातील नारनौल परिसरातील रहिवासी होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये ही भीषण अपघात झाला आहे. टिटावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, फ्लायओव्हरवरून जाणारी एक भरधाव कार अनियंत्रित होऊन डिव्हायडरवर आदळली आणि त्यानंतर विजेच्या खांबाला धडकली. यानंतर कारला आगीने वेढलं. या दुर्घटनेत गाडीतील सहाही जण जळून जागीच ठार झाले. या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
प्राथमिक माहितीनुसार, कारमधील प्रवासी हरियाणातून शामलीमार्गे मुझफ्फरनगरच्या दिशेने जात होते. ही घटना तिटावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका उड्डाणपुलावर घडली. भरधाव कार अचानक अनियंत्रित झाली, आणि दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर विजेच्या खांबावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की, गाडीला काही क्षणातच आग लागली. आग इतक्या वेगाने पसरली की गाडीतील लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अक्षय संजय महाडिक यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्ती हरियाणामधील नारनौलजवळ असलेल्या 'राखीखाक' (Rakhikhak) गावचे रहिवासी आहेत. मात्र, त्यांच्यात काही कौटुंबिक नाते होते का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात ते मित्र असावेत असे वाटते. पोलीस सध्या त्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्यातील परस्पर संबंधांचे स्वरूप जाणून घेण्यासाठी माहिती गोळा करत आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या शोकाकुल कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, मृतांच्या कुटुंबांशी संपर्क साधून त्यांना सर्वतोपरी मदत पुरवण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. याव्यतिरिक्त, अपघातानंतर आवश्यक असलेली सर्व मदत आणि आधार मिळवून देण्याची खात्री प्रशासनाने करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.