काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र बिलॉन्गिंगः ए जर्नी ऑफ लव प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकात त्यांनी त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे वर्णन केले आहे. त्यांनी राजकीय गोष्टींवरही भाष्य केले आहे. लवकरच सोनिया गांधी यांच्या आयुष्यावर एक सिनेमादेखील येण्याची शक्यता आहे. अलीकडेच तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष जग्गा रेड्डी यांनी गुरुवारी सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचे फिचर फिल्ममध्ये रुपांतर करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा त्यांनी संगारेड्डीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर केली आहे. जग्गा रेड्डी यांनी नेते आणि कार्यकर्त्यांनी चित्रपट निर्मितीसाठी योगदान देण्याचंही अपील केले आहे.
बैठकीत संगारेड्डी क्षेत्राचे काँग्रेस संयोजक जुसकंती अंजनेयुलु यांनी चित्रपटासाठी दोन कोटी देण्याची घोषणा केली होती. जग्गा रेड्डी यांनी गांधी भवनचे जनसंपर्क अधिकारी हरिप्रसाद यांच्या देखरेखीखाली चित्रपट निर्मितीसाठी 20 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. ते म्हणाले, "तुम्ही निवडणुकीवर जसा खर्च करता, तसंच समजा. बजेट वाढवा आणि चांगल्या दिग्दर्शकाची निवड करा." तयारी पूर्ण झाल्यावर, चित्रीकरण सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि टीपीसीसी अध्यक्ष महेश कुमार गौड यांना आमंत्रित करण्यात येईल, असंही समजतेय.
जग्गा रेड्डी यांनी म्हटलं की, चित्रपटात सोनिया गांधी यांच्या आयुष्यातील विविध पैलू उलगडले जातील. चित्रपटात इंदिरा गांधी यांची सून, राजीव गांधी यांची पत्नी आणि राहुल-प्रियंका गांधी यांची आई हे सगळी रुपे बघायला मिळतील. चित्रपटात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतर आलेले दुःख, सोनिया गांधी यांनी सहन केलेली कठिण परिस्थिती, मुलांना संभाळण्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यांचा राजकीय प्रवास हे देखील दाखवण्यात येईल.
सोनिया गांधींनी भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात स्वतःला सिद्ध केले. पंतप्रधानपदाबद्दल त्यांनी कोणतीही इच्छा दाखवली नाही. राजीव गांधींच्या हत्येनंतर आणि नंतर जेव्हा यूपीए सरकार स्थापन झाले, तेव्हा जेव्हा नेत्यांनी त्यांना पंतप्रधान बनवण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांनी नकार दिला आणि मनमोहन सिंग यांना संधी दिली. सोनिया गांधींच्या विचारांनी मनरेगासारख्या योजनांनाही हातभार लावला, असंही जग्गा रेड्डी यांनी म्हटलं आहे.