एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहताना अनेकदा जोडप्यांना बऱ्या गोष्टींशी तडजोड करावी लागते. मात्र कुटुंब मोठं असलं तरी प्रत्येक जोडप्याला खासगी स्पेस मिळाली पाहिजे अशी किमान अपेक्षा असते. अनेकदा या अपेक्षा पूर्ण होत नाही किंवा असा काहीतरी प्रकार घडतो की हे शक्यच नाही असं वाटू लागत असल्याचे अनुभव अनेकजण हल्ली सोशल मीडियावर शेअर करतात. एका महिलेला असाच एक अनुभव आला असून रात्री तिने धक्कादायक घटनाक्रम लपून आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा आहे.
कुठे घडला हा प्रकार? कोण आहे हा इसम?
सध्या चर्चेत असलेली ही घटना झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातील गंगटा गावात घडली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेने आपल्या सासऱ्याला रात्रीच्या वेळी तिच्या बेडरूमच्या खिडकीतून डोकावताना कॅमेरात कैद केलं आहे. मुलगा आणि सुनेच्या बेडरूममध्ये डोकावणाऱ्या या इसमाचं नाव श्याम भगत असल्याची माहिती समोर आली आहे.
बऱ्याच काळापासून होता संशय, जाबही विचारला पण...
हा व्हिडीओ शूट करताना महिला बारीक आवाजामध्ये नेमका हा प्रकार काय आहे हे सांगतेय. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, अनेक महिन्यांपासून कुटुंबातील सदस्यांना रात्रीच्या वेळी काहीतरी अयोग्य घडत असल्याचा संशय होता. माझे सासरे श्याम भगत वारंवार जोडप्याच्या बेडरूमच्या खिडकीजवळ रेंगाळताना दिसायचे. याआधी जेव्हा त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी आपण फक्त बाथरूमकडे जात होतो, असे सांगितले होते. अनेकदा त्यांनी आपण रात्री काहीही विचित्र करत नसल्याचं सांगत घरच्यांचा गैरसमज होत असल्याचा आव आणला.
अखेर सुनेनं हिंमत दाखवली अन्...
मात्र नक्कीच काहीतरी गडबड असल्याचा संशय असल्याने आणि सासऱ्यांच्या स्पष्टीकरणावर विश्वास न बसल्यामुळे आणि त्यांना जाब विचारण्यापूर्वी पुराव्याची गरज असल्याने, सुनेने बेडरूममधील दिवे बंद केले आणि सासऱ्यांची कृती कॅमेरात टिपण्यासाठी सेटअप लावला. त्याच रात्री मध्यरात्री या महिलेने तिच्या मोबाईल फोनवर बेडरूमच्या खिडकीतून गुपचूप व्हिडिओ रेकॉर्डिंग केले.
मोबाईलवर शूट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये सासरा श्याम भगत त्याच्या मुलाच्या आणि सून रात्री झोपत असलेल्या खोलीत डोकावून पाहताना दिसत आहे. या महिलेने पूर्वीही आपल्याला हे असं होत असल्याचा संशय होता आणि आता तर या व्हिडीओच्या माध्यमातून पुरावाच सापडला असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ जास्तीत जास्त व्हायरल करण्याचं आणि मुलगा, सुनेच्या खासगी जीवनात ढवळाढवळ करणाऱ्याला धडा शिकवण्याचं आवाहन केलं आहे.
अनेकांनी सांगितलं असा अनुभव आलाय
कॅमेरात रेकॉर्ड झालेल्या या घटनेमुळे वैयक्तिक गोपनीयतेच्या उल्लंघनावरून मोठा संताप व्यक्त होताना दिसतोय. या व्हायरल व्हिडीओखाली इतरही अनेक महिलांना त्यांना असा अनुभव आल्याचं म्हटलं असून एकीने तर आम्ही वेगळ्या घरात शिफ्ट झाल्याचं म्हटलं आहे. अन्य एकाने तर, "तुमच्या सासऱ्यांना दिवाळीनिमित्त टीव्ही खरेदी करुन द्या", असा खोचक सल्ला या महिलेला दिला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या फारच चर्चेत असल्याचं दिसत आहे.