पाकिस्तानला धूळ चरत U19 आशिया कप जिंकणाऱ्या टीम इंडियाला किती प्राईज मनी मिळणार? BCCI ने केलं स्पष्ट
U19 Asia Cup 2026 : पाकिस्तानला अंडर 19 आशिया कप 2026 च्या फायनलमध्ये पराभूत करणाऱ्या युवा टीम इंडियाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच या संघाला आता किती प्राईजमनी मिळणार याबाबत अनेकांमध्ये उत्सुकतता निर्माण झालेली आहे. याबाबत BCCI च्या सचिवांनी स्पष्ट केलं आहे.
U19 Asia Cup 2026 : भारतीय अंडर 19 क्रिकेट संघाने अंडर 19 आशिया कप 2026 वर नाव कोरलं आहे. 2022 नंतर प्रथमच टीम इंडियाने या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं असून गतविजेत्या पाकिस्तानला त्यांनी धूळ चारली आहे. भारतीय संघाने फायनल सामन्यात 1 विकेटने रोमांचक विजय मिळवला. टीम इंडियाला विजयासाठी पाकिस्तानने 338 धावांचं मोठं टार्गेट दिलं होतं. हे टार्गेट पूर्ण करताना भारतीय संघ संघर्ष करत होता, मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये युवा फलंदाजांनी पाकिस्तानच्या जबड्यातून विजय खेचून आणला. या विजयानंतर चॅम्पियन U19 भारतीय पुरुष संघाला किती प्राईजमनी मिळणार याबाबत अनेकांमध्ये उत्सुकतता निर्माण झालेली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव देवजीत सैकियाने युवा खेळाडूंच्या धाडसाचं कौतुक केलं आणि त्यांना किती प्राईजमनी मिळणार याप्रश्नावर सुद्धा उत्तर दिलं.
अंडर 19 टीम इंडियाला किती प्राईज मनी मिळणार?
अंडर 19 आशिया कपमध्ये भारतीय संघाला मिळालेल्या या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकियाने खेळाडूंचं भरभरून कौतुक केलं. ANI शी बोलताना सचिव देवजीत सैकिया म्हणाले की तरुण खेळाडूंना आर्थिक बक्षिसांविषयीच्या चर्चेपासून दूर ठेवले पाहिजे, जेणेकरून ते पूर्णपणे आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकतील. देवजित सैकिया यांनी म्हटले, 'हे खेळाडू अजून खूप लहान आहेत. कृपया त्यांच्यासमोर बक्षीस रक्कम किंवा आर्थिक लाभांसारखे विषय काढू नका,त्यांचे संपूर्ण लक्ष केवळ त्यांच्या खेळावरच असायला हवे. पैसे आणि बक्षिसे मिळवण्यासाठी त्यांच्यासमोर संपूर्ण आयुष्य पडलेले आहे, परंतु आज त्यांना मिळालेला अनुभव आणि आत्मविश्वास त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी सर्वात मोठी प्रेरणा ठरेल. यापेक्षा मौल्यवान दुसरी कोणतीही गोष्ट असू शकत नाही'.
आक्रमक सेलिब्रेशनबाबत काय म्हणाले देवजीत सैकिया?
अंडर 19 आशिया कप फायनलमध्ये शेवटच्या बॉलवर चौकार लगावून भारतीय खेळाडूंनी विजय पाकिस्तानच्या जबड्यातून खेचून आणला. त्यानंतर भारतीय युवा खेळाडूंनी आनंदाच्या भरात पाकिस्तानी डग आउटच्याजवळ जाऊन आक्रमक सेलिब्रेशन केलं. यावर काहींनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं. मात्र बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी खेळाडूंची पाठराखण केली आहे. त्यांनी सांगितले की हा आनंदोत्सव खेळाडूंच्या कधीही हार न मानणाऱ्या वृत्तीचे दर्शन घडवतो आणि अत्यंत कठीण परिस्थितीत सामना जिंकल्यानंतर त्यांना आनंद साजरा करण्याचा पूर्ण अधिकार आहे.